भवताल

पर्यावरण, शाश्वतता या विषयांबाबत कृतिशील जागरुकता निर्माण करणारा मंच. समाजाच्या विविध क्षेत्रातील घटकांना पर्यावरणाच्या मुद्द्यांवर भूमिका घेण्यासाठी प्रवृत्त करणे, त्यासाठी त्यांना माहिती-ज्ञानाबाबत सक्षम करणे या दृष्टीनेही ‘भवताल’ प्रयत्नशील आहे. ‘भवताल’च्या कार्यक्षेत्राच्या केंद्रस्थानी संपूर्ण महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची नैसर्गिक संसाधने, वारसा - परंपरा यांचे अनोख्या पद्धतीने दस्तावेजीकरण (Documentation) करणे... अशा प्रकारे महाराष्ट्र जगापुढे सादर करणे हासुद्धा ‘भवताल’चा उद्देश आहे. हा मंच गेल्या ऑक्टोबर २०१५ पासून अस्तित्वात आहे.

 

व्हीजन :

आधुनिक माणूस (सेपियन) आणि निसर्ग यांच्यातील नाते पूर्वापार चालत आले आहे. माणसाने आतापर्यंत निसर्गाचा वापर करूनच स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवले आणि विकास घडवून आणला. या काळात त्याचा निसर्गावर बोजा पडतच होता. गेल्या अडीचशे वर्षांमध्ये, त्यातही विशेषत: गेल्या ५० वर्षांत माणूस आणि निसर्ग यांच्यातील समतोल कमालीचा ढळतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा समतोल बिघडणे शाश्वत विकासाच्या दृष्टीने परवडणारे नाही. तो टिकवून ठेवणे हे निसर्गाप्रमाणेच माणसासासाठीसुद्धा आवश्यक आहे. त्यामुळेच निसर्गाशी सुसंगत विकास करणारा समाज निर्माण करणे ही काळाजी गरज आहे.

मिशन :

देशातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्र हा आता मोठ्या संकटाच्या शिखरावर उभा आहे. पर्यावरण-पाणी या विषयीच्या समस्या, बिघडलेले निसर्गचक्र, नैसर्गिक संसाधनांची येऊ घातलेली टंचाई ही काही संकटे. ही संकटे आणि त्यांच्यामुळे निर्माण झालेले दुष्टचक्र थांबवणे अतिशय गरजेचे आहे. हे करण्यासाठी महाराष्ट्रात मोठी ताकद उभी करणे.

त्यातून सामाजिक, शैक्षणिक संस्था, राजकीय क्षेत्र, माध्यमे, नागरिकांचे स्वयंस्फूर्त गट / संस्था यांच्यामध्ये पाणी-पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या जाणिवा विकसित करणे आणि त्यांना या विषयांबाबतचे त्यांचे कार्यक्रम आखण्यास मदत करणे, पाणी-पर्यावरण या विषयांवर भूमिका घेण्यासाठी प्रवृत्त करणे. याचा परिणाम महाराष्ट्रात दर्जेदार पर्यावरण, पाण्याची उपलब्धता-उत्तम नियोजन, सुदृढ निसर्गचक्रं राखण्यावर होईल. परिणामी माणसाचे जीवन अधिक सुसह्य बनेल.

हे बदल घडवून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

उद्दिष्ट्ये:

 

  • पर्यावरण, शाश्वततेबाबत जागरूकता निर्माण करणे. नागरिकांनी शाश्वततेच्या दिशेने पाऊल उचलावे यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, त्यासाठी विविध उपक्रम राबविणे.
  • निसर्ग, पर्यावरण, शाश्वतता यांच्या मुद्द्यांसंबंधी माहिती, ज्ञान यांची देवाण-घेवाण करण्यासाठी मंच उपलब्ध करून देणे.
  • स्थानिक पर्यावरणाचे मुद्दे जागतिक पातळीवर चर्चिले जावेत तसेच, जागतिक घडामोडी व मुद्द्यांचा स्थानिक संदर्भात अर्थ काढता व्हावा यासाठीचा मंच विकसित करणे.
  • सध्याच्या आधुनिकतेच्या परिघात नागरिकांना शाश्वत जीवनशैलीबद्दल पर्याय सुचविणे, ते उपलब्ध करून देणे. त्याद्वारे समाजाची शाश्वततेच्या दिशेने मार्गक्रमणा व्हावी या दृष्टीने त्यांची मानसिकता निर्माण करणे.
  • नैसर्गिक संसाधने, परंपरागत ज्ञान-शहाणपण-वारसा या संदर्भात महाराष्ट्राचे दस्तावेजीकरण करणे.                                                                                                                                      विविध उपक्रम:
  • भवताल मासिक:

            

पर्यावरण, शाश्वतता या विषयांच्या विशिष्ट मध्यवर्ती कल्पनेवर आधारित आशयपूर्ण मजकूर आणि आकर्षक, रंजक मांडणी असलेले अंक हे भवताल मासिकाचे वैशिष्ट्य. त्याद्वारे महाराष्ट्रातील विविध नैसर्गिक संसाधनांचे दस्तावेजीकरण केले जाते. उदा. पाऊस, महाराष्ट्रातील खडक, देवराई, परंपरागत जल व्यवस्था, महाराष्ट्रवासी जीव, भूजल, आदी.

  • भवताल कट्टा:

पर्यावरणातील तज्ज्ञ, संशोधक, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यासाठीचे माध्यम. या अंतर्गत सध्याचे कळीचे तसेच, काही महत्वाचे मुद्दे हाताळले जातात.

  • लोकांसोबत उपक्रम:

        

याअंतर्गत भवताल फेस्ट, बीजगोळे निर्मिती, शाडूमातीचे गणपती बनवणे, टाकाऊतून टिकाऊ अशा कार्यशाळा भरवल्या जातात. त्याद्वारे नागरिकांना कृती करायला लावून त्यांच्यावर निसर्ग-पर्यावरणाच्या संवर्धनाचा संस्कार केला जातो.

  • भवताल इको-टूर्स:

    

लोकांना आसपासच्या भवतालाची तज्ञांसोबत माहिती तसेच, अनोखा अनुभव देणाऱ्या टूर्स.

  • भवताल-कोर्सेस:

निसर्गइतिहासवारसा यातील महत्त्वाच्या विषयांचा परिचय करून देणारे किंवा सखोल मार्गदर्शन करणारे कोर्सेस.

इम्पॅक्ट / फलित :

  • समाजाला पर्यावरणाबाबत जागरूक करण्याच्या दृष्टीने ‘भवताल’ने व्यापक सकारात्मक भूमिका बजावली आहे. ‘भवताल’ हजारो नागरिकांपर्यंत पोहोचले आहे. हा मंच नागरिकांना पर्यावरणाच्या विविध मुद्द्यांबाबत संवेदनशील बनविण्याच्या दृष्टीने कारणीभूत ठरला आहे.
  • सोशल मीडियावर २५ हजारांहून अधिक नागरिकांचा गट निर्माण करण्यास ‘भवताल’ यशस्वी ठरले आहे. तसेच, ‘भवताल’च्या विविध पोस्ट्स व व्हिडिओ यांना आतापर्यंत तब्बल १० लाखांहून अधिक व्ह्यूज् प्राप्त झाले आहेत.
  • ‘भवताल’च्या बीजगोळे निर्मिती, मातीच्या गणेशमूर्ती बनवणे, फेस्ट अशा उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष ५००० हून अधिक नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. त्यात शालेय विद्यार्थी, महिला, युवक, कंपन्यांमधील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश होता.
  • भवताल आणि चेस्ट रीसर्च फाउंडेशन (सीआरएफ) यांनी ३५ पेक्षा जास्त शाळांमध्ये ‘अंतर्गत हवाप्रदूषण’ या विषयावर जागरूकता मोहीम राबवली. त्यात ३००० हून अधिक विद्यार्थ्यांना हवाप्रदूषणाची समस्या, परिणाम, प्रदूषण कमी करण्याचे उपाय याबाबत सजग केले. त्यांनी हे प्रदूषण कमी करण्याचा संकल्प केला.
  • ‘भवताल इको-फॅक्ट्स’ या उपक्रमाद्वारे नागरिकांपर्यंत पर्यावरणाबाबत नेमकी माहिती व संकल्पना पोहोचवण्याचे मूलभूत काम होत आहे. त्याद्वारे नागरिकांना पर्यावरणाबाबत वस्तुनिष्ठ दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होत आहे.
  • भवताल मॅगझीनद्वारे महाराष्ट्रातील महत्वाच्या, पण दुर्लक्षित विषयांवर प्रकाश टाकण्यात येत आहे. त्यातील लेख, मजकूर, मांडणी व छपाईचा दर्जा यामुळे ते मराठी वाचकांमध्ये अतिशय लोकप्रिय ठरले आहे. त्याद्वारे या दुर्लक्षित विषयांकडे लक्ष वेधले जात आहे. त्यामुळे काही गोष्टींच्या संवर्धनाच्या दृष्टीने मदतही होत आहे.