Articles 
सूर्याची बायको राणुबाई कुठून आली, याची गोष्ट!

सूर्याची बायको राणुबाई कुठून आली, याची गोष्ट!

सूर्याची बायको राणुबाई कुठून आली, याची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी ५३)

श्रावण महिन्यात व्रतवैकल्याचा भाग म्हणून अनेक कथा वाचल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे आदित्य - राणुबाईची कहाणी. त्यातला आदित्य म्हणजे सूर्य आपल्या ओळखीचा असला तरी त्याच्या बायकोचं असलेलं राणुबाई नाव मला वेगळं वाटलं. ही कहाणी आईकडून पहिल्यांदा ऐकली त्यावेळी मी आईला दुरुस्त करायला गेले- रेणू असेल, राणू काय? मग राणीचं लाडाने राणू झालं,असा दुसरा समज ! पण स्वतः वाचल्यावर ती राणुबाई आहे हे समजलं आणि मग नाव लक्षात राहून गेलं. आदित्य आपला वाटला तरी दरवेळी राणुबाई मात्र परक्याच वाटत. सूर्याने अशा नावाची बायको आणली कुठून, असा प्रश्न पडे.

असे काही आपल्या मनात असले ना की त्यासारखे कुठे काही वाचले की चित्त मधमाशीसारखे लगेच त्यामागे जाते. कारण त्यानंतर कितीतरी काळाने लोककला आणि लोकगीतांचा अभ्यास करताना समजले की मध्य प्रदेशातील नेमाड प्रांतात लोकपर्व गणगौर सण साजरा करतात. त्यात शंकर-पार्वतीची राजा धनियर आणि रणुबाई रूपाची पूजा गहू आणि ज्वारीच्या ताज्या ओंब्या-कणसांनी केली जाते, हे वाचण्यात आले.
रणादेवी आणि रन्नासन्ना

लोक साहित्यकार रामादादा यांच्या नेमाडी लोकगीतात याचे फार सुंदर वर्णन आहे. थारो काई काई रूप बखानू रणुबाई, सौरठ देश सी आई हो... असे एक प्रसिद्ध लोकगीत आहे. म्हणजे धनियर राजाची रनुबाई प्रत्यक्ष सौराष्ट्रातून आल्याचा हा उल्लेख आहे. आजही
सौराष्ट्र, गुजरात, नेमाड, राजस्थान प्रांतात रणुबाईची उपासना, आराधना केली जाते. तिथे तिची मंदिरेदेखील आहेत. या सर्व प्रांतांना सांस्कृतिकदृष्ट्या जवळच्या असलेल्या खान्देश प्रांतात ती रणादेवी नावाने पूजली जाते. तिथे ती सूर्यपत्नी असल्याचा उल्लेख रा. चिं. ढेरे यांच्या लोकदेवतांच्या पुस्तकात आहे.

खान्देशात मंगलकार्यापूर्वी एका रविवारी काळ्या मातीत सात प्रकारची धान्य पेरून लग्नापर्यंत त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे. त्यावेळी म्हटल्या जाणाऱ्या श्लोकात देवीचे नाव रन्नासन्ना देवी असे घेतले जाते. ही रन्नासन्ना देवी मांगल्य आणि संतानप्राप्तीचे सुख देणारी आहे, असा तो श्लोक आहे. रन्नादेवीची मंदिरे गुजरात प्रांतातही आहेत. उत्तर प्रदेशातील साहित्य, इतिहास, संस्कृती आणि कलाअभ्यासक लेखक वसुदेवशरण अग्रवाल यांनी ही राजस्थान, सौराष्ट्र प्रांतातली रनुबाई, रन्नादेवी म्हणजे सूर्यपत्नी राज्ञी असल्याचा उल्लेख एका लेखात केला आहे. या राज्ञीदेवीची देखील उपासना याच प्रांतात केली जाते. चौदाव्या शतकातल्या तिच्या एका मूर्तीवरील लेखात उल्लेख सांबादित्य पत्नी श्री रनादेवीअसा आहे. पोरबंदर आणि किन्नर खेडा येथे तिची मंदिरे आहेत.

आता राज्ञीचा संदर्भ येतो तो थेट वेदपुराणांत. कारण यात सूर्याला राज्ञी आणि निक्षुभा या दोन पत्नी आहेत असा स्पष्ट उल्लेख आहे. आता वेदपुराणातील या देवप्रतिमा निर्माण झाल्या त्यामागे तत्त्व, शास्त्र आणि अर्थ यांचा सखोल अभ्यास आहे. वेद-उपनिषदे, पुराणांत त्यांचा पाया असला तरी तो धागा समाजातील लोक, समजुती, व्यवस्था चालीरीती आणि विश्वास यातून अत्यंत समर्पक पणे गोवला गेलाय आणि सामान्यांच्या मनात संस्कार म्हणून रुजवण्याचाही प्रयत्न त्यात आहे. त्या त्या स्थळ,काळ आणि वेळेच्या चौकटीत समाजात निर्माण झालेल्या गरजांप्रमाणे देव समाजमानातून घडवले आणि पूजले गेले. हा देवदेवतांचा इतिहास सांगतो.

राज्ञी नावाचे मूळ

पुराणातील हे राज्ञी नाव आले कुठून? याचेही मूळ मोठे रंजक आहे. आठव्या शतकातली ही गोष्ट. मूळ देश पर्शिया म्हणजे आजचा इराण. तिथे राहणारे पारशी लोक अरबांच्या आक्रमणामुळे त्रस्त झाले. अत्यंत कणखर आणि चिवट वृत्तीने आपला धर्म वाचवण्यासाठी त्यातील काही लोक भारतात स्थलांतरित झाले. त्यांचा पंथ होता झोराष्ट्रीयन. धर्मग्रंथ होते झेंद आणि अव्हेस्ता. यांचा धर्मग्रंथ आपल्या ऋग्वेदानंतर दुसऱ्या क्रमांकाचा प्राचीन ग्रंथ समजला जातो. त्यावेळी गुजरातमध्ये असलेल्या जादवराणा राजाने या स्थलांतरित लोकांना आश्रय दिला. त्यावेळी त्याने त्यांना गुजराती समाज जीवनात मिसळून जाण्यासाठी काही अटी घातल्या. असे म्हणतात की दुधातल्या साखरेप्रमाणे हे पारशी लोक आपल्या संस्कृतीत एकरूप झाले. हे लोक निसर्गदेवतांचेही पूजक होते. सूर्य, चंद्र, जल, भू, वायू या देवतांसाठी यज्ञयाग बलिदान अशी पूजा करणारे यातले मागी लोक पौरोहित्य करत असत. ईश्वराची पूजा वा उपासना अग्नीद्वारे होत असे. त्यामुळे यांच्या, आपल्या यज्ञयागांशी साधर्म्य असलेल्या अग्निकुंडांचीही आपल्याला ओळख झाली.

दोन वेगवेगळ्या संस्कृती,लोक समजुतीने एकत्र आले की त्यांच्यात सांस्कृतिक देवाणघेवाण होणे स्वाभाविक आहे. त्यांनी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी हा मार्ग स्वीकारला याचे अप्रूपही आपल्या समाजाला वाटले. आता यानंतर घडून आला तो प्रभाव आणि प्रतिमांचा संकर. त्यातून पुन्हा नवीन प्रतिमा निर्माण झाल्या. निसर्गपूजक तर आपणही होतोच. इराणी सूर्य उपासनेत रश्न आणि नश्रेफ या मीथ्र म्हणजे मित्रच्या सहचारी आहेत.

एकमेकांच्या गोष्टींचा स्वीकार

सामोपचाराने स्वीकार असेल तर एकमेकांच्या जगण्यातल्या अनेक गोष्टींचा स्वीकार केला जातो. आपल्या वेदांची भाषा आणि पारशी गाथा यात मुळातूनच बरंचसं साम्य आढळतं. अगदी देवतांमधील साम्यापासून ते इतर अनेक दुवे सापडतात. उदाहरणार्थ, देव–दैव, असुर–अहूर, मित्र-मिथ्र, वरुण-वरेण, विवस्वान–विवहवंत, यम-यिम, सोहम्-होम, मास-माह असे दोन्ही धर्मातील कर्मकांडाविषयी साधर्म्य साधणारे अनेक दुवे सापडतात.

या रश्नचीच मग पुढे राज्ञी झाली. आणि भारतीय लोकांमध्ये ती आणखी सोपी होत रनुबाई, रांदल नावाने मुरून गेली. आणि नश्रेफ ची निक्षुभा झाली. आपल्या पुराणांमध्ये राज्ञीचे पर्यायी नाव संज्ञा असेही दिले आहे. आता खान्देशातली रन्नासन्ना देवी म्हणजेच राज्ञी आणि संज्ञा आहे हे लक्षात येईल. रा. चिं ढेरे यांच्या पुस्तकात अलेक्झांडरच्या स्वारीच्या वेळीच पौरोहित्य करणारे मगब्राह्मण इराण मधून भारतात आले असा उल्लेख आहे.

शक-कुशाणांच्या काळात त्यांनी पंजाब, कोणार्क, काल्पी या ठिकाणी सूर्याची भव्य मंदिरे उभारली. या मंदिरातले पौरोहित्य मगब्राह्मण लोक करतील हा दंडक वराहमिहिर याने बृहसंहितेत घालून दिला आहे. तो स्वतः मगब्राह्मणच होता. सौराष्ट्रातील भोजक आणि मग यांचे रक्त-संबंध जोडले गेल्यावर मगांसारखेच भोजकही सूर्यपूजेचे हकदार बनले. या भोजकांनीच पुढे महाराष्ट्रातील सुर्यमंदिरात पौरोहित्य केले असा उल्लेख एका दान लेखात आहे. भोजक पुरोहितांनी महाराष्ट्रात रनुबाई आणली आणि महाराष्ट्रीयन मातीत ती राणुबाई म्हणूनच मिसळून गेली ती तेव्हापासूनच!

कहाणीतल्या आदित्य राणूबाईचे मूळ असे दूरवर इराणमध्ये सापडले. ढेरेंनी राणुबाईविषयी लिहितांना इराणीने केला हिंदवी भ्रतार संगम साचार संस्कृतीचा असे म्हटले आहे.
वेगवेगळ्या मानस प्रतिमांचा आधार घेऊन व्यक्त होणारे हे सांस्कृतिक आदिबंध इतक्या मोठ्या कालप्रवाहात टिकले, शाश्वत झाले. स्थळकाळाच्या, परिस्थितीच्या आणि मानवी भावभावना,जाणिवा यांच्याशी संबंधित असलेल्या त्यांच्या जन्मकथा आजही कालबाह्य वाटत नाहीत. कारण स्थळ, काळ बदलले माणसे बदलली तरीही त्यांच्या जाणिवा, भावनांचे स्वरूप काही बदलत नाही.
मनाला पडलेल्या प्रश्नाचा शोध काळाच्या प्रवाहातली अनेक कोडी सोडवत नेतो आणि स्थळ, काळवेळेचा तो आदिम, अथांग प्रवाह वर्तमानातल्या आपल्यालाही सामावून पुढे वाहत राहणार आहे याची खात्री पटते. माणसांना एकमेकांशी जोडणाऱ्या या प्रवाहात इतरांशी, चराचराशी आणि जगण्याशी असलेले आपले नाते समजायला लागते आणि त्यांच्या आपल्या अस्तित्वाला जोडणारा एक सुंदर भवताल उमजायला लागतो. हे समजून घेणे हा खरंच एक सुंदर प्रवास आहे. आता आपल्या लाडक्या आदित्यची ही राणुबाईदेखील आपल्याला अगदी अगदीच आपलीशी वाटते.

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या मालिकेतील ही ५३ वी गोष्ट.)

 

- डॉ. अंजली औटी, नाशिक

[email protected]

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

4 Comments

ज्योत्स्ना

फारच माहितीपूर्ण लेख,आवडला

Bhavatal Reply

आभार.

राजीव डोळे

म्हणजे मग आता हिला "इ-राणूबाई " म्हणायला हवं 😀

Bhavatal Reply

धन्यवाद.

Vrushali Kulkarni

फारच छान लेख आहे हा. यातील बर्‍याच गोष्टी वेगवेगळ्या माहीत होत्या पण त्यांचे लागेबांधे असे आहेत हे लक्षात आले आणि मजा वाटली. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏

Bhavatal Reply

धन्यवाद. आपल्या संपर्कात शेअर करावा, ही विनंती.

Mandar Vedak

नवलच आहे

Bhavatal Reply

हो, पण हे असं आहे :-)

Your Comment

Required fields are marked *


You may also like