Articles 
बेस्ट ऑफ महाराष्ट्र- १

बेस्ट ऑफ महाराष्ट्र- १

लाव्हा टनेल!

महाराष्ट्रातील निसर्ग, पर्यावरण, हेरिटेज यातील अद्भुत अशा गोष्टी उलगडून दाखवणारा उपक्रम...

महाराष्ट्र हा दक्खनच्या पठाराचा भाग. ज्वालामुखीच्या उद्रेकातून साडेसहा कोटी वर्षांपूर्वी लाव्हारस बाहेर पडला. तो थंड झाल्यामुळे इथल्या पठाराची निर्मिती झाली. भूवैज्ञानिक दृष्ट्या शिल्ड अर्थात ढाल (म्हणजे त्यासारखे भरभक्कम) मानले जाणारे हे पठार. या पठारावर इथल्या ज्वालामुखीच्या अनेक खाणाखुणा आढळतात. त्यापैकी एक म्हणजे, अद्भुत आणि एकमेवाद्वितीय असा लाव्हा टनेल! अहमदनगर जिल्ह्यातील खिरविहिरे जवळील एका डोंगरावर हे भूवैज्ञानिक वैशिष्ट्य लपलेले आहे.

अहिल्यानगर (पूर्वीचा अहमदनगर) जिल्ह्याची पाऊसमानानुसार विभागणी केली तर पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करता येतात. त्यापैकी पूर्व भाग अतिशय कोरडा, कमी पावसाचा तर पश्चिमेकडील भाग भरपूर पावसाचा, काहीसा दुर्गम असा आहे. याच दुर्गम भागात राजूर, भंदारदरा परिसरातील अनेक डोंगर आहेत. त्यापैकी खिरविहिरे जवळील एका डोंगरावर हे भूवैज्ञानिक वैशिष्ट्य लपलेले आहे. ते इतके अनोखे आहे की त्याच्यासारखे दुसरे वैशिष्ट्य माझ्या पाहण्यात नाही. भूविज्ञानाची वैशिष्ट्ये पाहण्याच्या दृष्टीने मी बराचसा महाराष्ट्र पालथा घातला आहे; पण हे पहिल्यांदा पाहिले तेव्हा इतका हरखून गेलो होतो की त्याचे वर्णन शब्दांत करताच येणार नाही. हे वैशिष्ट्य मन भरून पाहिले, त्याच्या सानिध्यात बराच काळ घालवला. तो अनुभव फार वेगळा होता.

साधारणपणे तीनेक वर्षांपूर्वी हा डोंगर शोधत शोधत त्या ठिकाणी पोहोचलो होतो. मी तिथे का आणि कसा पोहोचलो, हीसुद्धा आवर्जून सांगावी अशी गोष्ट आहे. ‘भवताल’ने इको-कोर्सेस सुरू केले. त्याची सुरुवात झाली, ‘दगडांच्या देशा’ या कोर्सपासून. आपल्या बेसॉल्ट खडकाचे म्हणजेच काळ्या पाषाणाची निर्मिती, व्याप्ती, प्रभाव, उपयोग असे विविध पैलू उलगडणारा आणि त्याचा आपल्या जगण्याशी किती घट्ट संबंध आहे याची मांडणी करणारा हा कोर्स. त्यासाठी ज्येष्ठ पुराजीव अभ्यासक डॉ. विद्याधर बोरकर, भूजलतज्ज्ञ डॉ. हिमांशु कुलकर्णी, भूविज्ञानाच्या प्राध्यापक डॉ. तनुजा मराठे आणि मी असे चौघे जण विविध पैलूंची मांडणी करणार होतो. 

माझे एक सत्र होते, ‘स्टक्चर्स इन बेसॉल्ट’ म्हणजेच काळ्या पाषाणातील भूरूपे. त्यात 'लाव्हा टनेल'बाबत चर्चा केली. त्या कोर्सचे एक सहभागी होते मुंबईचे अमित सामंत. ते भरपूर भटकंती करतात आणि त्यावर samantfort.blogspot या स्वत:च्या ब्लॉगद्वारे लिहितात. त्यांनी या ठिकाणाबद्दल विचारले. आमच्या सत्रात केलेल्या वर्णनावरून तो लाव्हा टनेल असावा, अशी शक्यता व्यक्त केली. त्याच वेळी मला त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. बेसॉल्टमधील एका आगळ्या वैशिष्ट्याबद्दल इतका उत्तम धागादोरा मिळाल्यावर मी कुठला गप्प बसतोय. लगेचच वेळ काढून योग जुळवून आणला. २०२१ सालच्या ख्रिसमसच्या दिवशी तिथे पोहोचलो. सोबत गणेश कोरे आणि आनंद गाडे हे मित्र होते. त्यानंतर ‘भवताल इकोटूर्स’च्या ‘वंडर्स ऑफ जिऑलॉजी’ या उपक्रमांतर्गत अनेकांना त्याचे दर्शन घडवले आणि त्याचे अनोखेपण लक्षात आणून दिले.

लाव्हा टनेल’ नेमका कसा आहे?
ज्वालामुखीतून बाहेर आलेला लाव्हारस वाहताना काही बोगदे तयार होतात. त्यापैकी हा एक. भूवैज्ञानिक भाषेत ‘लाव्हा टनेल’. याचे वेगळेपण म्हणजे हा एक बोगदा नाही, तर इथे एकमेकांना छेदणारे दोन बोगदे तयार झाले आहेत. ते नैसर्गिकरित्या तयार झाले आहेत. त्यांचा सर्वसाधारणपणे अधिक किंवा गुणाकार यांच्या चिन्हासारखा आकार तयार झाला आहे. दोन बोगदे जिथे एकमेकांना छेदतात तो मध्य. तिथून चारही बाजूंना भुयारी मार्ग दिसतात. ते आरपार निघाले आहेत. त्यांची लांबी वेगवेगळी आहे. मध्यापासून चार बाजूंना साधारणपणे १० फूट ते सुमारे ४० फूट अशा त्यांची लांबी भरेल. त्याच्या चारपैकी दोन बाजूंमधून सर्वसाधारण माणूस सरपटत किंवा हातावर - गुडघ्यावर बसून पुढे सरकू शकतो, मध्यापर्यंत पोहोचू शकतो. ‘लाव्हा टनेल’च्या मार्गाला सर्वसाधारणपण गोलाई पाहायला मिळते. इथल्या टनेलचे छत कमानीकृती आहे. त्यावरून हा लाव्हा टनेल असल्याची खात्री पटते. यापैकी एका मार्गामध्ये देव बसवण्यात आला आहे. त्याला 'चेंबदेव' असे म्हणतात. त्याच्या दर्शनाला स्थानिक लोक येत असतात.

निर्मितीचे कारण काय?
ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लाव्हारस थंड झाल्यामुळे आपला खडक तयार झाला आहे. त्या वेळी लाव्हारस मोठ्या प्रमाणात पसरला आणि बरेच अंतर वाहिला. या लाव्हारसाचे तापमान कितीतरी जास्त म्हणजे १००० ते ११०० अंश सेल्सिअस इतके होते. पृष्ठभागावरील लाव्हारस हवेच्या संपर्कात आल्यामुळे लवकर थंड झाला. मात्र, तो थंड झाल्यामुळे खडकाचा थर तयार झाल्याने आत वाहणाऱ्या लाव्हारसाला लवकर थंड व्हायला संधी मिळाली नाही. त्यामुळे तो वाहत राहिला. बोगद्यासारखा मार्ग आणि त्यातून वाहणारा लाव्हारस अशी स्थिती निर्माण झाली. त्या वेळी घडलेल्या गुतागुंतीच्या प्रक्रियांमध्ये वेगवेगळ्या भागावर कमी-जास्त प्रमाणात दाब असणार. अशा वेळी दाबातील तफावतीचा परिणाम म्हणून एखाद्या बोगद्यातून वाहत असलेला लाव्हारस कुठेतरी एका बाजूला खेचला गेला. त्यामुळे बोगद्यात आतमध्ये पोकळी तशीच राहिली. अशा प्रकारे या ‘लाव्हा टनेल’ची निर्मिती झाली. हे सारे आपल्या खडकाच्या निर्मितीच्या वेळी म्हणजे सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी घडले. त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर हालचाली झाल्या. ऊन-वारा-पाऊस-प्रवाह यांच्यामुळे आपल्या खडकांची झीज, अपक्षय झाला. त्या पश्चातही हा ‘लाव्हा टनेल’ आताच्या स्थितीत अस्तित्वात आहे. तो इतक्या चांगल्या प्रकारे महाराष्ट्रात इतरत्र कुठेही पाहायला मिळालेला नाही… हा महाराष्ट्राच्या दृष्टीने विलक्षण असा नैसर्गिक वारसाच!

- अभिजित घोरपडे
[email protected]

(लेखक भवताल मंचाचे संस्थापक आहेत.)

बेस्ट ऑफ महाराष्ट्र हा केवळ त्या ठिकाणांबाबत जाणून घेण्यासाठी नव्हे, तर ती पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठीचा उपक्रम आहे. त्यात तुम्हीही सहभागी होऊ शकता. अधिक माहितीसाठी सोबत दिलेली लिंक क्लिक करा.

 

लिंक : https://bhavatal.com/Best-of-Maharashtra1

 

संपर्कासाठी : 9545350862 / [email protected]

(भवताल मासिक - मार्च २०२४ च्या अंकातून साभार)

0 Comments

Your Comment

Required fields are marked *

You may also like