Articles 
धावडी (वनस्पतींच्या नावांच्या गोष्टी)

धावडी (वनस्पतींच्या नावांच्या गोष्टी)

धावडी

शास्त्रीय नाव : यूट्रिक्युलारिया परप्यूरेसेन्स

'धावडी' ही एक कीटकभक्षी वनस्पती आहे. धावड जमातीचे लोक त्यांच्या डोक्यावर या फुलाच्या दृश्यमान स्वरूपातील पगडी धारण करीत असत. त्यावरूनच या वनस्पतीस 'धावड' नाव रुढ झाले. महाबळेश्वर परिसरातील विस्तृत पठारी प्रदेशांमध्ये ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये बहरात 'धावडी' आपल्या गर्द निळ्या-जांभळ्या रंगाच्या ताटव्यांनी लक्ष वेधून घेते. 
महाबळेश्वर ते कोयनानगरपर्यंतच्या सलगपणे पसरलेल्या विस्तृत पठारी प्रदेशांमध्ये निम-पाणथळ ठिकाणी ही कीटकभक्षी वनस्पती आढळून येते. पाण्याच्या छोट्या-छोट्या प्रवाहांबरोबर वाहत आलेले कृमी-कीटक मटकावून ही वनस्पती आपली नत्र तथा पोषणमूल्यांची गरज पूर्ण करते. जमिनीलगत दोन ते पाच इंचावर दिसून येणाऱ्या या वनस्पतीच्या ३ ते ४ इतर प्रजाती या भागात आढळून येतात. फुलांचा दृश्य आकार साधारणतः आपण डोक्यावर घालत असलेल्या टोपीसारखा असतो. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये बहरात ती आपल्या गर्द निळ्या-जांभळ्या रंगाच्या ताटव्यांनी लक्ष वेधून घेते. संपूर्ण पठारांवर याची दुलई पसरते.

हल्लीच्या पर्यटनविश्वात हिला 'सीतेची आसवे' म्हणून संबोधन देण्यात आलेले आहे. परंतु, ते तितकेसे समर्पक अथवा साधार नाही. या नावाबाबत कोणीही स्थानिक त्याची पुष्टी करत नाहीत, अथवा ते 'कुणीतरी' असेच घुसडलेले आहे, असे त्यांचे मत आहे. याउलट, स्थानिक भाषेत या वनस्पतीस 'धावडी' म्हणून ओळखले जाते. तर, या नावाची पार्श्वभूमी अशी की, पूर्वीच्या काळी, विशेष करून शिवकाळात किंवा त्यापूर्वीदेखील या भागात सर्वदूर लोखंड वितळवून त्याचे ओतकाम करणारी किंवा त्यापासून भांडी, हत्यारे, शेतीची अवजारे बनवणारी 'धावड' नावाची एक जमात वास्तव्यास होती. सध्याही त्यातील काही कुटुंबे या परिसरात विखुरलेली दिसून येतात. हे धावड जमातीचे लोक त्यांच्या डोक्यावर या फुलाच्या दृश्यमान स्वरूपातील पगडी धारण करीत असत. त्यावरूनच या वनस्पतीस 'धावड' नाव रुढ झाले. पिढ्या दरपिढ्या ते प्रचलित असल्याचे स्थानिक लोक सांगतात.

मूळ नाव- धावडी

नंतरचे नाव- सीतेची आसवे

- सुनील भोईटे
9421997301 / [email protected]

(लेखक सातारा येथील निसर्ग अभ्यासक व मानद वन्यजीव रक्षक आहेत.)

वनस्पतींचे नाव किती महत्त्वाचे? असे कोणी विचारेल, पण नावात बरेच काही आहे. नावात अस्तित्व आहे, इतिहास आहे, सांस्कृतिक वारसा आहे आणि ज्याला नाव दिले गेले त्याची संपूर्ण ओळख आहे. म्हणून नाव महत्त्वाचे. ते पुसले गेले किंवा बदलले की जणू त्या गोष्टीची, त्याच्याशी संबंधित असलेल्या भवतालाची आणि समुदायाची ओळखच पुसली जाऊ शकते. अलीकडे काही मंडळी स्थानिक संदर्भांच्या अज्ञानातून किंवा इतर कारणांमुळे या वनस्पतींना वेगळीच नावे देत आहेत. त्यामुळे मूळ नावे मागे पडू शकतात. म्हणूनच पिढ्यान पिढ्या माहीत असलेल्या वनस्पतींच्या प्रजातींची मूळ नावे व त्यांचे स्थानिक संदर्भ उलगडून दाखवणारा हा उपक्रम ‘भवताल’ मंचावर राबवत आहोत. त्यात वनस्पतिविज्ञानाचे ख्यातनाम अभ्यासक डॉ. एस. आर. यादव, डॉ. मिलिंद सरदेसाई, डॉ. अपर्णा वाटवे, या विषयाचा कितीतरी दशके धांडोळा घेणारे कृतिशील निसर्ग अभ्यासक सुनील भोईटे यांच्यासारख्या मंडळींचा समावेश आहे.

(संवाद आणि प्रतिक्रियांसाठी: [email protected])

- संपादक

(भवताल मासिक- मार्च २०२४ च्या अंकातून साभार)

0 Comments

Your Comment

Required fields are marked *

You may also like