Articles 
या वर्षी १०६ टक्के पावसाची शक्यता!

या वर्षी १०६ टक्के पावसाची शक्यता!

- आताच्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर चांगल्या परिस्थितीची शक्यता

 

भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मोसमी पावसाचा पहिल्या टप्प्यातील अंदाज आज जाहीर केला. त्यानुसार देशात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या वर्षी पावसाळ्यात पडलेल्या अपुऱ्या (९४ टक्के) पावसाच्या पार्श्वभूमीवर हा अंदाज दिलासा देणारा ठरणार आहे.

मोसमी पावसासाठी तीन प्रमुख घटक पूरक ठरल्यामुळे हे वर्ष पावसाच्या दृष्टीने चांगले ठरण्याची शक्यता आहे. त्यात पुढील घटकांचा समावेश आहे.

* मोसमी पावसासाठी पूरक ठरणारा "ला-निना" हा घटक सक्रिय होण्याची शक्यता.
* हिंदी महासागरातील तापमानाशी संबंधित "इंडियन ओशन डायपोल" हा घटक पूरक असणे.
* उत्तर गोलार्धात जानेवारी ते मार्च २०२४ या काळातील हिम आवरण सरासरीपेक्षा कमी असणे.

याचबरोबर, सध्या सक्रिय असलेल्या आणि मोसमी पावसावर विपरीत प्रभाव टाकणाऱ्या "एल-निनो" या घटकाचा प्रभाव कमी होत आहे. या सर्व गोष्टींमुळे यंदा नैऋत्य मोसमी पावसाचे प्रमाण अधिक असेल, असे हवामान विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

भारतामध्ये नैऋत्य मोसमी पावसाच्या काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ८७० मिलिमीटर इतका सरासरी पाऊस पडतो. त्याच्या १०६ टक्के पाऊस पडेल. मात्र, त्यामध्ये पाच टक्क्यांची त्रुटी संभवते. त्यामुळे प्रत्यक्षात पडणारा पाऊस वर्तवलेल्या अंदाजापेक्षा ५ टक्के कमी ते ५ टक्के जास्त या दरम्यान असू शकतो. या पुढील टप्प्यातील सुधारित अंदाज मे महिन्याच्या अखेरीस वर्तवला जाईल, असे हवामान विभागतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

विपरीत "एल-निनो" ते पूरक "ला-निना"!

पावसावर विपरीत प्रभाव टाकणारा "एल-निनो" हा घटक गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात विशेषतः उत्तरार्धात सक्रिय होता. त्याचा परिणाम कमी पावसाच्या रूपाने झाला. आता मात्र या विपरीत स्थितीत बदल होत आहे. येत्या पावसाळ्यात "ला-निना" हा घटक सक्रिय होऊन पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

 

नकाशाच्या ओळी

या वर्षीच्या मान्सून काळातील पावसाची स्थिती कशी असेल, याचा अंदाज देणारा नकाशा. निळ्या रंगछटांनी दर्शवलेल्या प्रदेशावर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्‍यता आहे. हिरव्या रंगछटांनी दर्शवलेल्या ठिकाणी सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे. केशरी-पिवळ्या रंगछटांनी दर्शवलेल्या प्रदेशावर सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर पांढऱ्या रंगाने दर्शवलेल्या क्षेत्रावर पावसाच्या अंदाजाबाबत स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत.
(सौजन्य- भारतीय हवामान विभाग)

0 Comments

Your Comment

Required fields are marked *

You may also like