Articles 
वटवृक्षांची तोड आणि पिकांचे नुकसान यांचा संबंध दाखवणारी गोष्ट!

वटवृक्षांची तोड आणि पिकांचे नुकसान यांचा संबंध दाखवणारी गोष्ट!

वटवृक्षांची तोड आणि पिकांचे नुकसान,

यांचा संबंध दाखवणारी गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी १९)

 

वडाच्या झाडांची तोड आणि पिकांचे नुकसान यांचा काही परस्परसंबंध असेल, यावर वरवर कोणाचा  विश्वास बसणार नाही. पण सांगली जिल्ह्यात गेल्या दोन वर्षातील काही घटनांनी असा संबंध दाखवून दिला आहे. २०१९ आणि २०२० या वर्षात, सांगली

जिल्ह्याच्या काही भागात द्राक्ष, चिक्कू, डाळिंब अशा फळबागांवर वटवाघळांचे हल्ले झाले. त्यांनी रात्रीच्या अंधारात अनेक बागांची निम्म्याच्या आसपास फळे फस्त केली गेली. बरं, यात फळं खाणं कमी आणि नासाडी जास्त होती. उभ्या पिकांवर आलेल्या या अनपेक्षित संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले.

काही शेतकऱ्यांनी एखाद-दुसऱ्या वटवाघळाची चाहूल लागताच शेतात पक्षीप्रतिरोधक जाळी बसविणे, तीव्र प्रकाशझोताचे दिवे लावणे असे उपाय केले. सर्वच वटवाघळे निशाचर. त्यांना अंधारातच संचार करण्याची सवय. त्यामुळे प्रखर प्रकाशझोतामुळे काही अंशी वटवाघळांना दूर ठेवण्यास मदत झाली. परंतु, काही ठिकाणी वटवाघळे पक्षीरोधक जाळ्यांमध्ये अडकली आणि मृत्युमुखी पडली. त्यामुळे हे उपाय महागडे ठरलेच, शिवाय ते शाश्वतही नाहीत असे दिसून आले. हे उपाय म्हणजे भळभळत्या खोल जखमेवर वरवर मलमपट्टी करण्याजोगेच. पण हे हल्ले अचानक का सुरू झाले याचे मूळ शोधण्याचा प्रयत्न झाला का?

 

भारतात १२३, महाराष्ट्रात ५० प्रजाती

वटवाघूळ अभ्यासक डॉ. महेश गायकवाड यांच्या अभ्यासानुसार जगभरात वटवाघळांच्या १०१३ प्रजाती आढळतात. यापैकी सुमारे १२३ प्रजाती भारतात, तर ५० प्रजाती महाराष्ट्रात आढळतात. यातील सुमारे ८० टक्के प्रजाती कीटकभक्षी तर २० टक्के प्रजाती फलाहारी असतात. म्हणजेच महाराष्ट्रातील एकूण प्रजातींपैकी फळे खाणाऱ्या खूप कमी आहेत. महाराष्ट्रात सहजपणे दिसणारी फलाहारी वटवाघळांची जात म्हणजे इंडियन फ्लाईंग फॉक्स (Pteropus giganteus). ही वटवाघळे मुख्यतः फळे आणि फुलातील मध यावर उपजीविका करतात. यांच्या आहारात झाडांच्या सुमारे ३०० विविध जातींची फळे, फुले, खोड, शेंगा, मध यांचा समावेश असतो. पण सर्वात महत्वाची गोष्ट अशी की पांचट चवीमुळे माणसाला न आवडणारी वड, पिंपळ, उंबर अशा अंजीरवर्गीय झाडांची फळे वटवाघळांना मात्र फार आवडतात. वंदन एस.इ. आणि कालीश्वरन बी. या संशोधकांनी २०११ साली मदुराई इथे केलेल्या अभ्यासात असे आढळले आहे की वटवाघळांच्या विष्टेत फळांच्या बियांपैकी ७० टक्के वडाच्या झाडाच्या असतात.

 

वडाचे पर्यावरणातील स्थान

वड ही भारतीय परिसंस्थांमधील अत्यंत महत्वाची वनस्पती आहे. त्याची फळं वटवाघळं, अनेक प्रजातीचे पक्षी, माकडं यांचेही खाद्य आहे. वडाच्या भरपूर पसरलेल्या फांद्या आणि त्याच्या पानांची सावली यामुळे पक्ष्यांना घरटी करायला आदर्श जागा मिळते. तसेच वटवाघळांसाठी सुद्धा विश्रांती घेण्याचे हे उत्तम ठिकाण असते. रात्रभर अन्नाच्या शोधत भटकणारी वटवाघळे सकाळ होताच गुहा, कडेकपारी, जुन्या इमारतींच्या वळचणी इथे विश्रांतीसाठी एकत्र येतात आणि उलटी लटकून राहतात. इंडियन फ्लाईंग फॉक्स आकाराने खूप मोठी असल्याने त्यांना लटकण्यासाठी दाट सावली देणारी आणि खूप फांद्या असलेली मोठी झाडे लागतात. वड, पिंपळ, अर्जुन, खोटा अशोक ही झाडे अशा प्रकारच्या निवाऱ्याकरिता खूप उपयुक्त असतात. वडाची झाडे त्यांना खाद्य आणि निवाराही पुरवतात. मग या बदल्यात वडाच्या झाडांना काय मिळते? तर वडाच्या झाडांचे पुनरुत्पादन हे सर्वस्वी पक्षी आणि वटवाघळं यांच्यामुळे होते. वडा-पिंपळाच्या बिया नुसत्या जमिनीवर पडल्या तर रुजत नाहीत. पक्षी आणि वटवाघळं त्याची फळं खातात आणि त्यांच्या पोटात या फळांच्या बियांवरील कठीण आवरण विरघळते. मग त्यांच्या विष्टेतून या बिया जिथे कुठे पडतात तिथे वडा-पिंपळाची नवीन रोपे उगवतात. थोडक्यात काय तर वड आणि वटवाघूळ यांच्यातील नातं परस्परपूरक सहजीवन (Symbiotic association) या स्वरूपाचं असतं. पण अशा या वडाच्या झाडांची सगळीकडची सद्यस्थिती मात्र फारशी चांगली नाही. 

 

पूर्वी वडाची झाडे अनेक रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या संख्येने दिसायची. यांच्या फांद्या व पारंब्या यांचा विस्तार प्रचंड प्रमाणात होत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी निर्माण होणाऱ्या छत्र्या रस्त्याच्या वर मधोमध एकमेकांत मिसळून जायच्या. त्याखालून जाणाऱ्या ट्रक, एसटी बस अशा मोठ्या वाहनांना घासून घासून वरच्या पारंब्यांना गोलाकार आकार प्राप्त व्हायचा. अशा प्रकारे निर्माण झालेल्या पारंब्यांच्या कमानी आणि बोगद्यातून गाडी जाताना आपल्याला किती आल्हाददायक वाटते हे जुन्या काळी या रस्त्यावरून प्रवास केलेल्या लोकांकडून समजेल.

 

गेल्या १० - १५ वर्षांमधील आघात

दुर्दैवाने, गेल्या १०-१५ वर्षात या वडाच्या झाडांवर अचानक संक्रांत आली. वाढत्या वाहतुकीमुळे रस्ते अपुरे पडू लागल्याने सर्वत्र रस्ता रुंदीकारणाची जी कामे जोमाने सुरू झाली, त्यात या वडाच्या झाडे मोठ्या प्रमाणात तोडली गेली. खरंतर हे काम करणाऱ्या ठेकेदाराने केलेल्या करारानुसार, एका तोडलेल्या झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु, हा करार पाळला जातो की नाही याची शहानिशा बहुतांश वेळा होतच नाही. एखाद्याने खरोखरीच एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावली तरी तोडलेल्या वड-पिंपळाच्या बदल्यात रेनट्री, गुलमोहर, टॅबुबिया असली परदेशी, स्थानिक पर्यावरणासाठी पूर्णतः कुचकामी झाडे लावली जातात. आणि अगदी एखाद्याने पुन्हा वड-पिंपळाची झाडे लावलीच तरीही ती झाडे मोठी होऊन त्याचा पक्षी व वटवाघळे यांना उपयोग होईपर्यंत किमान २०-२५ वर्षे जातात. म्हणजे या काळात पर्यावरणाचे किमान पंचवीस वर्षांचे नुकसान होते.

 

वडाच्या झाडाची मुळे खूप दूरवर पसरून इमारतीच्या भिंतींना नुकसान पोहोचवतात. त्यामुळे गावात,शहरात वडाची झाडे लोक फारशी लावत नाहीत. तसेच जुनी, मोठी वडाची झाडे तोडून टाकण्याकडेही लोकांचा कल आहे. शेतकरी लोक शेताच्या बांधावर वडाचे झाड लावत नाहीत, कारण त्याच्या सावलीमुळे पिकांचे नुकसान होते असे त्यांचे म्हणणे असते. मग अशा परिस्थितीत वडाच्या झाडांनी कुठे आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे? आणि त्यावर अवलंबून असलेल्या पशुपक्ष्यांनी कुठे जायचे? हे प्रश्न अनुत्तरीतच राहतात. 

माणसाने वड-पिंपळाची झाडे तोडून वटवाघळांच्या अन्नाचे आणि निवाऱ्याचे हक्काचे स्रोत उद्ध्वस्त केले. हे स्रोत पुन्हा निर्माण करण्याचीही माणसाची मानसिकता नाही. मग या वटवाघळांनी जगण्यासाठी काय करायचं? निसर्ग नियमानुसार, कोणताही प्राणी अथवा पक्षी अस्तित्वाच्या लढाईत सहजासहजी हार मानत नाही. तो प्रथम बदलत्या भौतिक परिस्थितीशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करतो. वन्यजीवांनी मानवी शहरांशी जुळवून घेणे याला जीवशास्त्रात 'सिनअर्बनायजेशन' असे म्हणतात, तर त्यांनी माणसाने निर्माण केलेल्या अनैसर्गिक भौतिक परिस्थितीनुसार स्वतःची जीवनशैली विकसित करणे याला 'सिनअँथ्रोपायजेशन' अशी संज्ञा आहे. वटवाघळे देखील नेमके हेच करत आहेत. त्यांना विश्रांतीच्या जागा मिळेनाशा झाल्यावर त्यांनी दिसतील तिथे उंचावर निवारा शोधायला सुरुवात केली.

वटवाघळांनी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत देखील बदल केला आहे. वडा-पिंपळाची फळे पुरेशी मिळत नाहीत म्हणून मग माणसाने पिकविलेल्या आयत्या फळांकडे ते मोर्चा वळवितात. पूर्वीही एखाद्-दुसरे वटवाघूळ फळबागांमध्ये आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. पण टोळधाडीप्रमाणे झुंडीने फळबागांवर हल्ले करण्याचे प्रमाण आता वाढले आहे. वरील घटना पाहिल्यावर, वड आणि वटवाघूळ यांचा परस्परसंबंध कोणालाही सहज लक्षात येईल.

 

वटवाघळाची प्रतिमा

प्राचीन काळापासून मानवी समाजात वटवाघूळ हा एक बदनाम झालेला जीव आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे वटवाघळे करीत असलेला कर्कश्श गोंगाट आणि त्यांच्या वस्तीजवळ येणारा घाण वास! भुताखेतांच्या कथा, कादंबऱ्या, चित्रपट यात भीतीदायक वातावरण निर्मितीसाठी हमखास वटवाघळे दाखविली जातात. अलीकडच्या वैज्ञानिक संशोधनानुसार असे दिसून आले आहे की वटवाघळे ही रेबीज, सार्स, हेंड्रा, मारबर्ग, निपाह, कोरोना अशा माणसाला प्राणघातक आजार निर्माण करू शकणाऱ्या अनेक विषाणूंचे वाहक असतात. पण खरी गोष्ट अशी की वटवाघळांनी स्वतःहून हे आजार माणसांपर्यंत पोहोचविलेले नाहीत. त्यांचे मांस खाण्यासाठी किंवा केवळ छंद म्हणून माणसे यांची शिकार करतात आणि त्याच्या संपर्कात येतात म्हणून हे आजार पसरले. पण एक रेबीज वगळता भारतीय वटवाघळांमुळे यातील कोणतेही आजार पसरल्याचे सिद्ध झालेले नाही.

 

३०० प्रजातींच्या वनस्पतींना भेट

वटवाघळे ही सुमारे ३०० प्रजातींच्या वनस्पतींना भेट देत असल्यामुळे त्या झाडांचा बीजप्रसार आणि फुलांचे परागीभवन यात महत्त्वाची भूमिका बजावतात. कीटकभक्षी वटवाघळे प्रचंड प्रमाणात किडे खात असल्याने शेतीला उपद्रवी ठरणाऱ्या कीटकांचा मोठ्या प्रमाणावर फडशा पडतो. कीटकभक्षी वटवाघळांची विष्टा म्हणजेच ग्वानो ही नायट्रोजन या पोषकद्रव्याने परिपूर्ण असते. त्यामुळे दक्षिण अमेरिका आणि भारतातील तमिळनाडू, आंध्रप्रदेश, राजस्थान या राज्यात शेतीसाठी खत म्हणून त्याचा वापर केला जातो. राजस्थानी स्वयंपाकातील प्रसिद्ध ‘मथानिया मिरच्या’ या खास वटवाघळांच्या विष्टेचे खत घालून वाढविल्या जातात. असे असताना आपण मात्र निसर्गाला व पर्यायाने माणसाला भरभरून मदत देणाऱ्या वडाच्या आणि वटवाघळांच्या जीवावर उठलो आहोत. 

 

माणूस आणि वन्यजीव यांच्यातील या लढाईत वन्यजीवांची हार होणार हे निश्चित आहे. कारण माणूस आणि त्याची यंत्रे यांच्या राक्षसी ताकदीसमोर वन्यजीवांचा फार काळ निभाव लागणे शक्य नाही. पण या लढाया जिंकताना निसर्गाबरोबर नकळत सुरू केलेले युद्ध मात्र माणूस हरत चालला आहे याची त्याला जाणीव नाही !

(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी ‘भवतालाच्या गोष्टी’ या खास मालिकेतील ही एकोणिसावी गोष्ट.)

 

- डॉ. हर्षद दिवेकर

नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी, सांगली

[email protected]

 

सर्व छायाचित्रे- अभिजित घोरपडे

भवताल मासिकाच्या जानेवारी- २०२१ च्या अंकातून 

भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी एक पर्याय-  bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)

4 Comments

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी हे ज्ञानेश्वरांनी सांगितले. पण आम्ही मात्र विसरलो!

Bhavatal Reply

खरंय. धन्यवाद.

आम्ही नाही...आमचे so-called leaders. आज झाडे तोडणारा common man नाहीये...तर वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स च्या नावाखाली 100...200 वर्षां पूर्वीची झाडे तोडणारे आणि आपणच निवडून दिलेले leaders आहेत. Hoardings लावायची झाडे लावा झाडे जगवा आणि त्याच hoardings साठी जागा हवी म्हणून झाड कापायचे...

मी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या बाहेर आणि महाराष्ट्रभर शेतकरी संघटनेच्या कामानिमित्त भेटत असताना भटकंती करत असताना प्रचंड मोठमोठी आवडायच्या उंबराच्या आणि पिंपळाच्या वृक्षांची वृक्षतोड रस्त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केली जात आहे याबाबत तक्रारी केल्या हे अत्यंत महत्वाचं सूचक वक्तव्य झालेला आहे आणि निश्चितपणे आवाज उठवून मोठे रोड मध्ये गेलेल्या तोडलेल्या मोठ्या मोठ्या वृक्षांची नुकसान भरपाई म्हणजे पाच झाडे लावून कधीच होणार नाही तर त्या ठिकाणी किमान 50 झाडे लावली गेली पाहिजे आणि तितकाच बंधन वृक्षारोपण आणि संवर्धन हे महत्त्वाचा आहे हे या लेखातून दिसून आलेलं आहे की या वृक्षांमुळे रान्वर होणारे वटवाघळांच्या हल्ले हे खात्रीलायक रित्या सत्यप्रती दाखवून देत आहे लेखकाचे मनापासून धन्यवाद कृपया हा लेख मला आमच्या किसान डायरीमध्ये प्रकाशित करण्याची परवानगी द्यावी ही विनंती. विठ्ठल पवार राजे. प्रदेश अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक. शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य.

Bhavatal Reply

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. लेखक आणि भवतालच्या उल्लेखासह लेख वापरता येईल. त्यासाठी भवतालच्या ९५४५३५०८६२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Hemant Jadhav

खरच आहे निसर्गाच्या साखळीतील एक जरी दुवा निसटला तर संपुर्ण पर्यावरणास हानी म्हणजेच मानवी जीवन शैलिलाही हानी..छानच मार्गदर्शन करणारी माहिती.

Bhavatal Reply

होय, निसर्गाबाबत ही जागरुकता वाढायला हवी. धन्यवाद.

Your Comment

Required fields are marked *

You may also like