Articles 
टेस्ट ब्लॉग

टेस्ट ब्लॉग

जीवसृष्टीतील सूक्ष्मजीव

              ज्या सुगंधाने कवी मनाला व लेखकाला अनेकदा भुरळ पाडली, वसुंधरा व पर्जन्य यांच्यातील अद्भुतरम्य नात्याचा स्वैर कल्पनाविलास करण्यास उद्युक्त केलं तो सुगंध म्हणजे पहिला पाऊस पडल्यावर  येणारा मृदेचा सुगंध (पेट्रीचोर). या सुगंधाचे रासायनिक नाव आहे ‘जिओस्मीन’. या सुगंधामागील रहस्य आहे सूक्ष्मजीवांचा एक विशिष्ट गट, म्हणजे ‘अॅक्टीनोमाइसिटीस’. जेव्हा पावसाचे पाणी या सूक्ष्मजीवांवर पडते तेव्हा हे सूक्ष्मजीव ‘जिओस्मिन’ हे सुगंधी द्रव्य स्त्रवतात. घट्ट ताक घुसळत असताना जो एक आल्हाददायक सुंगंध आपल्याला खुणावत असतो, तो मुख्यत्वेकरून   ‘लँक्टोकोकस लँक्टीस’, ‘लँक्टोबँसिलस’ आणि ‘स्ट्रेप्टोकोकस   थर्मोफिलीस’ या जिवाणूच्या प्रजातीने निर्माण केलेल्या ‘ब्यूटेन-२,३-डायओन’  (डायएसिटील) या रसायना  मुळे असतो.  पावसाळ्यात गर्द ओलेत्या जंगलातून जाताना जो उग्र परंतु गोड सुगंध अनुभवास  येतो तो कवक वर्गीय भूछत्रांचा असतो. मिठागराजवळील पाण्यात जी  सुंदर शेंदरी  आणि लालबुंद रंगांची उधळण दिसते ती हॅलोबॅक्टरीयम वर्गीय जिवाणूंच्या वाढीमुळे असते. अमेरिकेतील जग प्रसिद्ध यल्लोस्टोनपार्क मधील उष्ण झऱ्यांमध्ये ज्या पिवळ्या, लाल, निळ्या, हिरव्या रंगांच्या मनोवेधक रंग छटा दिसतात त्या उच्च तापमानावर वाढणाऱ्या विविध जिवाणूंच्या वाढी होत. काही समुद्रकिनारी रात्रीच्या वेळेस फेसाळणाऱ्या  लाटांवर अतिशय मनमोहक निळ्यारंगाचा प्रकाश दिसतो. हा प्रकाश म्हणजेच फोटोबक्टरियम सारख्या जीवदीप्तीशील जिवाणूंचा आंतरिक प्रक्रियेने निर्मित प्रकाश होय. अंटार्क्टिक अथवा आर्क्टिक खंडातील उणे ३० अंशाला वाढणारी हिरवळ ही  नीलहरीत शैवालामुळे असते.

 

              निसर्गातील विविध अधिवासांमध्ये  भिन्न पोषकद्रव्ये असतात. या पोषकद्रव्यांमध्ये कार्बनचे स्रोत व नत्राचे स्रोत, व त्यांच्या  मात्रा किती आहेत, तसेच तेथील द्रव्याचा सामू (आम्लता अथवा आम्लारिता मापनाचे एकक) किती, तेथील आसमंताचे तापमान किती, जड धातूचे (उदा. पारा, अर्सेनिक, तांबे, शिसे, इत्यादीं) प्रमाण किती यांसारख्या भौतिक आणि रासायनिक घटकांवर त्या अधिवासातील सूक्ष्मजीवांचे प्रकार आणि त्यांची वाढ अवलंबून असते.     

 

सृष्टीतील त्यांचे कार्य आणि  महत्व:

 

            मनुष्य , इतर प्राणी आणि वनस्पती हे  सूक्ष्मजीव समुदायावर आपण कल्पनाही  करू शकणार  नाही त्यापेक्षा जास्त अवलंबून आहेत. असे म्हटल्यास अजिबात अतिशयोक्ती होणार नाही की सूक्ष्मजीव हे हवा श्वास घेण्यायोग्य बनवतात, प्राण्यांना  निरोगी ठेवतात, नवीन औषधांचे स्रोत प्रदान करतात, आपल्या आणि इतर प्राण्यांना अन्न पचनाला   मदत करतात, निसर्गातील धोकादायक रसायने अपचयीत करून नाहीसे करतात, आणि पिकांना आधार देतात व त्यांचे संरक्षण करतात.  सूक्ष्मजीव समुदाय ऑक्सिजन (प्राणवायू), कार्बन, नायट्रोजन आणि गंधक यांसारखी  आवश्यक मूलद्रव्ये  आपल्या ग्रहावरील इतर जीवांसाठी उपलब्ध करतात. याशिवाय पर्यावरणातील प्राणवायू चक्र, कार्बन चक्र, गंधक चक्र, नत्र चक्र आणि इतर अनेक जैविक मूलद्रव्यांची जीवन चक्रे विविधप्रकारच्या जिवाणू आणि कवकांमुळे कार्यरत आहेत आणि निसर्गातील मूलद्रव्यांच्या स्थिरत्वाला कारणीभूत आहेत.  विघटनकारी सूक्ष्मजीवांशिवाय, जीव मृत शरीरांमध्ये गुदमरला असता. सूक्ष्मजीव आपल्या ग्रहावरील सुमारे ५०% प्रकाश संश्लेषण देखील करतात. त्याद्वारे ऑक्सिजनची पातळी वाढवतात आणि कार्बन डायऑक्साईडची पातळी कमी करतात. हवेतील नत्र पृथ्वीवरील मातीत, वनस्पतीत आणि प्राण्यांमध्ये आणण्याचे कार्य निव्वळ नत्रस्थिरकारक जिवाणूंमुळे (ऍझोटोबॅक्टर, रायझोबियम, विविध नील हरित शैवाले) होते. आज आपल्या सर्वांच्या शरीर-प्रथिनांमधील नत्र काही वर्षांपूर्वी नत्रस्थिरकारक जिवाणूंनी  हवेतून आपल्या पर्यंत पोहोचविण्याची तरतूद करून ठेवल्यामुळे आहे . प्राणी आणि वनस्पती दोन्ही अशा सूक्ष्मजीव समुदायाशी संबंधित आहेत जे अधिकाधिक  पोषकद्रव्ये  उपलब्ध करतात, रोगांपासून त्यांना संरक्षण प्रदान करतात, आवश्यक जीवनसत्वे तयार करतात किंवा त्यांचे संयोजन करतात. उदाहरणार्थ, प्रत्येक मानवी शरीरात प्रत्येक मानवी पेशीसाठी सुमारे १० सूक्ष्मजीव असतात, आणि हे सूक्ष्मजंतू पचन करण्यास मदत करतात, जीवनसत्व-के ची निर्मिती करतात, रोगप्रतिकारक शक्तीच्या विकासाला चालना देतात आणि हानिकारक रसायनांच्या  निर्विषीकरणास मदत करतात. आणि अर्थातच, ब्रेड, चीज, दही, वाइन व इतर मद्यार्के, लोणचे, इडली, डोसा आणि चहा सारख्या बर्याच पदार्थांच्या स्वादाचा आणि गंधाचा आनंद घेण्यासाठी सूक्ष्मजंतू आवश्यक आहेत. काही सूक्ष्मजंतू मानवी आजारास कारणीभूत असतात. परंतु आपल्या ग्रहावरील कोट्यावधी प्रकारच्या  सूक्ष्मजीवाणूं पैकी  रोग-उद्भवणारे सूक्ष्मजंतू (रोगकारक) केवळ अतीसूक्ष्म प्रमाणात आहेत. पृथ्वीच्या पर्यावरणातील अथवा पृथ्वीवरील बहुतांशी सूक्ष्मजीव अपायकारक नाहीत. वरील काही उदाहरणानुसार यात उपयुक्त सूक्ष्मजीव खूप आहेत, ज्यांचा इतर जीवांना फायदा होतो. सुरुवातीपासूनच मानवी उत्क्रांतीचा घनिष्ठ संबंध सभोवतालच्या सूक्ष्मजंतूंशी जोडला गेला आहे. सूक्ष्मजीवांचा मानवी आरोग्याला आणि पर्यावरणाला कसा अधिक उपयोग होऊ शकतो यावर मोठ्या प्रमाणात आधुनिक वैज्ञानिक संशोधन सुरू आहे.

                                                                      

 डॉ. गिरीश ब . महाजन, पीएच.डी ; एफ.एस.ए.बी

                                                       व्हाईस प्रेसिडेंट - सूक्ष्मजीवशास्त्र विभाग 

                                                               हयमीडीया लॅबोरेटोरीज प्रायव्हेट लिमिटेड -मुंबई

0 Comments

Your Comment

Required fields are marked *

You may also like