Articles 
उष्माघाताचे अर्धसत्य !

उष्माघाताचे अर्धसत्य !

राज्यात सध्या उकाडा वाढला आहे आणि गेल्या महिन्यात महाराष्ट्रभूषण पुरस्काराच्या वेळी उष्माघातामुळे दुर्घटनाही घडली. या पार्श्वभूमीवर तापमान, त्याचा शरीरावर होणारा परिणाम आणि उष्माघात याबाबतच्या मूलभूत गोष्टी माहीत असायलाच हव्या. अन्यथा, उष्माघाताबद्दलचे अर्धसत्य आणि गैरसमज हानीकारक ठरू शकतात. त्यासाठी “भवताल” मासिकाच्या एप्रिल २०२३ अंकातील संपादकीय मधील हा अंश...

 

जाहीर कार्यक्रमाचे नियोजन कसे नसावे याचे उदाहरण महाराष्ट्रभूषण पुरस्काराने घालून दिले. रखरखीत उन्हात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या वेळी हजारो लोकांना उष्म्याचा त्रास झाला आणि १४ लोकांना उष्माघातामुळे जीव गमवावा लागला. या घटनेच्या निमित्ताने हवामानाबाबत काही वैज्ञानिक मुद्दे निर्माण होतात. त्याबाबत एकूणच जनमानसात खूप मोठ्या प्रमाणात अज्ञान किंवा गैरसमज आहेत. ते दूर करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठीच ही वास्तवाची मांडणी.

उष्माघात होण्यासाठी हवेचे तापमान हा महत्त्वाचा घटक आहे. पण हा एकटा घटक त्यासाठी पुरेसा ठरत नाही, तर त्याच्यामधे आणखी एक घटक भर टाकतो. तो म्हणजे- आर्द्रता! म्हणूनच केवळ तापमान वाढले की उष्माघात होतो हे पूर्ण सत्य नाही, तर अर्धसत्य आहे. हवेचे तापमान किती आहे आणि त्या तापमानात आपणाला किती उष्मा जाणवतो, या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. प्रत्यक्ष जाणवणारा उष्मा याला ‘हीट इन्डेक्स’ ही संज्ञा वापरली जाते. आधी म्हटल्याप्रमाणे हा जाणवणारा उष्मा किंवा ‘हीट इन्डेक्स’ निर्माण होण्यामधे आर्द्रता म्हणजेच हवेतील बाष्पाचे प्रमाण महत्त्वाची भूमिका बजावते. तापमान आणि आर्द्रता यांचा एकत्रित परिणाम हा ‘हीट इन्डेक्स’ वाढवण्यास कारणीभूत ठरतो. एका सोप्या उदाहरणातून ही बाब स्पष्ट होईल.

हवेचे तापमान ३५ अंश सेल्सिअस असताना हवेतील आर्द्रता वेगवेगळी असेल तर जाणवणारा उष्मा (हीट इन्डेक्स) किती वेगळा असतो, हे पाहू. हवेचे तापमान ३५ अंश सेल्सिअस असताना,

  • आर्द्रता २० टक्के असेल तर जाणवणारा उष्मा ३३ अंश सेल्सिअस इतका असतो.
  • आर्द्रता ४० टक्के असेल तर जाणवणारा उष्मा ३७ अंश सेल्सिअस इतका असतो.
  • आर्द्रता ६० टक्के असेल तर जाणवणारा उष्मा ४५ अंश सेल्सिअस इतका असतो.
  • आर्द्रता ८० टक्के असेल तर जाणवणारा उष्मा ५७ अंश सेल्सिअस इतका असतो.

यावरून ही बाब स्पष्ट होते की तापमान कमी वाटले तरी आर्द्रतेनुसार जाणवणारा उष्मा किंवा ‘हीट इन्डेक्स’ जास्त असू शकतो, तो हानीकारकही ठरू शकतो. अर्थात, हवेचे तापमान ४२-४५ अंशांवर गेले तर एकटे तापमानही हानीकारक ठरू शकते, पण जोडीला आर्द्रता असेल तर त्याची तीव्रता प्रचंड वाढू शकते.

या दृष्टीने आर्द्रता जास्त असलेला मुंबई आणि कोकणच्या प्रदेशात हवेचे तापमान वाढले की उष्म्याचा धोका जास्त वाढतो. मुंबई, कोकणात जास्त घाम येतो, असे समजले जाते. हेसुद्धा वस्तुस्थितीला धरून नाही. शरीराचे तापमान वाढते तेव्हा ते नियंत्रित करण्यासाठी घाम येतो. घाम येण्यासाठी शरीरातील उष्णता वापरली जाते आणि थंड वाटते. मुंबई किंवा कोकणात मात्र थंड वाटत नाही. कारण तिथे फारसा घाम येत नाही, उलट हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त असल्याने घाम येण्यास प्रतिरोध होतो. त्यामुळेच जास्त उष्मा जाणवतो आणि उकडते. शरीरावर पाणी साचते तो घाम नसतो, तर हवेतील बाष्प साचलेले असते. त्यामुळे घाम आल्यासारखे वाटले तरी तसे नसते. याउलट, आर्द्रता कमी असलेल्या ठिकाणी उकाड्यामुळे जास्त घाम येतो. मात्र, कोरड्या हवेमुळे तो लगेचच उडून जात असल्यामुळे जाणवत नाही.

तापमान आणि उष्मा या गोष्टींबाबत जागरुकता निर्माण होण्यासाठी हे घटक वस्तुनिष्ठ पद्धतीने समजून घेण्याची आवश्यकता आहे. तसे झाले तर लोक स्वत:ची काळजी घेतील. ही बाब अनेक दुर्घटना टाळण्यास उपयुक्त ठरेल!

- अभिजित घोरपडे

abhighorpade@gmail.com

आपल्या भवतालाविषयी असे महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी ‘भवताल मासिका’ची नावनोंदणी जरूर करा.

लिंक - https://bhavatal.com/connectus/masik-nondani-information

6 Comments

Mohini

Very useful information..

Bhavatal Reply

Thank you so much.

Rita khandekar

Very useful and new perspective 👍

Bhavatal Reply

Thank you.

Avinash

छान माहिती दिली sir.. 👌

Bhavatal Reply

धन्यवाद.

Avinash

छान माहिती दिली sir.. 👌

Someshwar

Useful information.

Bhavatal Reply

Thank you.

Sachin Walunj

Nice information for knowledge growth 💹

Your Comment

Required fields are marked *

You may also like