Articles 
अशाप्रकारे

अशाप्रकारे "भवताल" चे वर्तुळ पूर्ण...

या फोटोंचं महत्त्व तुम्हाला उमगलं का??

 

हे फोटो पाहून कदाचित तुम्हाला विशेष वाटणार नाही, पण ते दिसायला साधे वाटले तरी ते खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट सांगतात. ही गोष्ट आहे भूविज्ञानाची, पृथ्वीच्या अनुषंगाने दडलेल्या रहस्यांची आणि "भवताल" ची सुद्धा!

 

हे दोन फोटो. त्यामध्ये तीन मुले दिसतात. एकात आहेत- निलभ आणि निहारिका गायकवाड हे भाऊ-बहीण. तर दुसऱ्या फोटोत आहे, ईशान सहस्रभोजनी. त्यांनी काहीतरी मांडलंय आणि त्याबद्दल ते इतरांना माहिती सांगताहेत. हे सांगताहेत प्राचीन काळातील जीवसृष्टीच्या रहस्यांबद्दल अर्थात पृथ्वीवर सापडणारी जीवाश्म आणि त्यांच्या मधून उलघडणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल. तसेच महाराष्ट्रातील काळा खडक आणि त्यातील स्फटिकांबद्दल.

आता यात विशेष काय, याबद्दल. "भवताल" तर्फे वेगवेगळ्या वयोगटांसाठी भूविज्ञान, निसर्ग तसेच नैसर्गिक अथवा मनुष्याने निर्माण केलेला वारसा या अनुषंगाने वेगवेगळे कोर्सेस आणि इकोटूर्स आयोजित केल्या जातात. त्यापैकीच भूविज्ञान अर्थात जिऑलॉजी समजून सांगणारा "दगडांच्या देशा" हा आपल्या बेसॉल्ट (काळा पाषाण) संदर्भातला कोर्स आणि पृथ्वीच्या प्राचीन काळातील जीवसृष्टीवर म्हणजेच जीवाश्मांवर (फॉसिल्स) प्रकाश टाकणारी "कच्छ फॉसिल्स" ही इकोटूर.

या फोटोत दिसणारी बच्चे कंपनी त्यांच्या पालकांसोबत या उपक्रमांमध्ये सहभागी झाली होती. त्यांनी हे सर्व समजून घेतलं, त्याचं ज्ञान मिळवलं, काही नमुने गोळा केले. ते तेवढ्यावरच थांबले नाहीत तर विज्ञान दिनी (२८ फेब्रुवारी) शाळेच्या किंवा इतर मंचावर त्यांनी हा विषय, गोळा केलेले नमुने, त्या संदर्भातल्या गोष्टी, त्यातून उलगडलेली रहस्यं इतरांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. म्हणजे "स्वतः मिळवणं ते लोकांपर्यंत पोहोचवणं" हे एक वर्तुळ या निमित्ताने पूर्ण झालं.

त्यांनी ही माहिती खूप चांगल्या प्रकारे सादर केली, पण मुद्दा तो नाही. ही प्रक्रिया आणि त्यांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. "भवताल" ने सुरू केलेल्या या उपक्रमांचा उद्देश नेमका हाच आहे- सोबत येणाऱ्या लहान-मोठ्यांना निसर्गातल्या वेगवेगळ्या विषयांशी जोडणे. त्यानंतर या मंडळींनी स्वतःला मिळालेली माहिती, उमगलेले ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवावे. अशाप्रकारे ही साखळी अखंड सुरू राहावी. हा हेतू या विद्यार्थ्यांना माध्यमातून चांगल्या प्रकारे पुढे जात आहे, ही आनंदाची गोष्ट. म्हणूनच आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशी ही सर्वांपर्यंत पोहोचवायची होती.

"भवताल" ने निसर्ग, पर्यावरण, वारसा या विषयांची जागरूकता, दस्तावेजीकरण व संवर्धन यासंदर्भात उभारलेली ही गुढी. ती अधिकच उंचावत आहे, हे सुद्धा सांगण्याचा हेतू. त्याला हातभार लावणारे निलभ गायकवाड, निहारिका गायकवाड आणि ईशान सहस्रभोजनी यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

* अभिजित घोरपडे 
संस्थापक, भवताल मंच
https://bhavatal.com
[email protected]

0 Comments

Your Comment

Required fields are marked *

You may also like