Articles 
दुबईच्या वाळवंटात महापूर

दुबईच्या वाळवंटात महापूर

- असे का घडले? काय धडा घ्यायचा?

वाळवंटात मुसळधार पाऊस पडतो तेव्हा काय होते, याचा प्रत्यय दोनच दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) भाग असलेल्या दुबईच्या वाळवंटी प्रदेशात आला. तिथे मंगळवारी, १६ एप्रिल रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. जगातील सर्वांत स्मार्ट शहरांपैकी एक असलेल्या दुबईमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले. दुबईमध्ये रत्यावर पाणी वाहू लागल्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वाळवंटात अचानक महाप्रलय उद्भवण्याचे नेमके कारण काय? आणि त्यातून आपण काय धडा घ्यायचा? याविषयी...

दुबईमध्ये काय घडले? का घडले?

दुबईमध्ये दीड वर्षांत सरासरी जितका पाऊस होतो, तितका पाऊस काही तासांमध्ये पडला, असे आकडेवारी सांगते. 'यूएई'ची सरकारी वृत्तसंस्था WAM ने मंगळवारी झालेल्या पावसाला ऐतिहासिक घटना असल्याचे म्हटले आहे. १९४९ नंतर देशातील हा सर्वाधिक पडलेला पाऊस आहे.

असे का घडले, याबाबतचे हवामानशास्त्र असे...
भारतात पाऊस पडण्यासाठी उष्ण कटिबंधीय भागात निर्माण होणाऱ्या हवामानाच्या व्यवस्था (weather systems) कारणीभूत असतात. त्याचप्रमाणे दुबई व आखाती प्रदेशाच्या भौगोलिक ठिकाणाचा विचार करता, तेथे मध्य कटिबंधीय प्रदेशातील हवामानाच्या व्यवस्था (weather system) तयार झाल्या तर पाऊस पडण्याची शक्यता असते. ज्या दिवशी (१६ एप्रिल) दुबईमध्ये अतिवृष्टी झाली, त्यादिवशी उपग्रह छायाचित्रावरून असे पहायला मिळाले की, या प्रदेशात मोठ्या प्रमाणात बाष्प निर्माण करणारी हवामान व्यवस्था (weather system) निर्माण झाली होती. त्याचा परिणाम म्हणून दुबई व परिसरात अतिवृष्टी झाल्याचे म्हणता येईल. दुबईमध्ये या हवामान व्यवस्थेमुळे पाऊस पडणे अपेक्षित होते. पण तो इतक्या मोठ्या प्रमाणात होणे ही अपवादात्मक घटना आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी 'भवताल रिसर्च टीम' शी बोलताना सांगितले.

प्रसिद्ध हवामानशास्त्रज्ञ कॉलिन मॅककार्थी यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, पर्शियन गल्फच्या पाण्यापासून तयार झालेले वादळ या परिस्थितीस कारणीभूत आहे. तर हवामानशास्त्रज्ञ फ्रेडरिक ओट्टो म्हणाले की, 'यूएई' आणि इतर प्रदेशांमध्ये होणार्‍या अतिवृष्टीला ग्लोबल वॉर्मिंगदेखील कारणीभूत आहे. ओमान आणि दुबईतील विध्वंसक पाऊस बदलत्या वातावरणामुळे आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

कृत्रिम पाऊस अर्थात 'क्लाउड सीडिंग' कारणीभूत होते का?

निसर्गाशी छेडछाड हे या पावसामागचे कारण असल्याचे काही तज्ञ सांगत आहेत. अलिकडेच पडलेला पाऊस, त्यानंतर दुबई आणि 'यूएई' च्या इतर भागांमध्ये आलेला पूर हे देशात होत असलेल्या कृत्रिम पावसाशी (क्लाउड सीडिंग) संबंधित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, या वृत्ताला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 

महापूर येण्याची कारणे कोणती?

१. वाळवंटी प्रदेशात 'जिप्सम'चा थर

वाळवंटांना कोरडे आणि पाण्याचे दुर्मिळ क्षेत्र मानले जाते; परंतु प्रत्यक्षात ते अधूनमधून पाऊस आणि अधूनमधून पूर परिस्थिती देखील अनुभवतात. हा पाऊस अनेकदा हंगामी हवामान बदल किंवा इतर हवामान प्रणालींमुळे देखील उद्भवू शकतो. परंतु, वाळवंटात कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती उद्भवते. कारण येथे उष्ण आणि कोरड्या परिस्थितीमुळे पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते. परिणामी जमिनीच्या खाली काही अंतरावर जिप्समचा (कॅल्शियम सल्फेट) कडक थर तयार होतो. त्यामुळे पृष्ठभागावरील पाणी त्वरीत जमिनीत शोषले जात नाही. ते साठून पृष्ठभागावर वाहते आणि पूर परिस्थिती उद्भभवते.

२. नैसर्गिक प्रवाहांच्या देखभालीचा अभाव

वाळवंटी भाग मुळातच कमी पावसाचे असल्यामुळे या भागांमधील नैसर्गिक प्रवाह (नद्या, नाले) हंगामी स्वरूपाचे असतात. ते पाऊस पडेल तेव्हाच नद्या प्रवाही होतात. परिणामी या भागातील पाणी वाहून नेणाऱ्या यंत्रणांची (उदा. नद्या, नाले, पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या) देखभाल दुरूस्ती वेळच्या वेळी होत नाही. किंबहुना त्यांच्यावर अतिक्रमणे होतात. त्यामुळे पूर येण्याचा धोका वाढतो.

३. वृक्षावरण कमी असणे

वाळवंटात पूर येण्याचे आणखी एक कारण म्हणजे हा प्रदेश वालुकामय असतो. येथे सुपीक माती नसते, शिवाय रखरखीत भागात वनस्पती विरळ असतात. परिणामी, वाळवंटात पाण्याचा निचरा होण्याची क्षमता तुलनेने कमी आहे. यामुळे पावसाळी पाणी साठून पृष्ठभागावर वाहते आणि त्याचे रुपांतर पूर परिस्थितीमध्ये होते. 

यावरून आपण काय धडा घ्यायचा?

दुबई हा वाळवंटी प्रदेश असला तरी समुद्रकिनारी प्रदेश सुद्धा आहे. इथे अचानक अशी परिस्थिती उद्भवली आणि प्रचंड महापूर आला. त्यामुळे इतर समुद्रकिनारी प्रदेशात सुद्धा भविष्यात असे काही घडू शकेल का, याचा विचार होणे आणि नियोजनात त्याची दखल घेणे आवश्यक आहे असे वाटते.

* डॉ. कृष्णानंद होसाळीकर
अतिरिक्त महासंचालक,
भारतीय हवामानशास्त्र विभाग

 

वाळवंटी प्रदेशातील यापूर्वीच्या महापुराच्या घटना

* २०१७ मध्ये जुलै महिन्यात गुजरात, राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थिती निर्माण झाली होती. कच्छचे रण आणि जैसलमेरसारख्या कोरड्या भागावरही या पुराचा परिणाम झाला होता. कच्छमध्ये वार्षिक सरासरीच्या ११९ टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली होती. 

* वाळंवटात पूर येण्याच्या घटना नवीन नाहीत. सौदी अरेबियामध्ये २०१९ मध्ये आलेल्या पुरामध्ये वाळवंटातील जहाज म्हणजेच उंट वाहून गेल्याची घटना घडली होती. तुफान बर्फवृष्टी आणि पावसामुळे येथील नागरिकांचे जीवन विस्कळीत झालेच; मात्र याची सर्वाधिक झळ प्राणीमात्रांना बसली. 

* २०२३ मध्ये ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या प्रभावाखाली दक्षिण राजस्थानच्या पाच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. राजस्थानमधील अनेक भागांना मुसळधार पावसाने झोडपल्याची नोंद आहे. 

* वाळवंटात पूर परिस्थिती ओढवत असली तरी हा पूर अल्पकाळ टिकणारा असतो आणि केवळ विशिष्ट हवामान परिस्थितीत उद्भवतो. वाळवंट बहुतेक वेळा कोरडेच असते. तथापि, वाळवंटातील पूर स्थानिक परिसंस्थेवर आणि मानवी रहिवाशांवर लक्षणीय परिणाम करू शकतात, कारण ते जमिनीची धूप, शेतजमीन आणि घरांचे नुकसान आणि जीव धोक्यात आणू शकतात.

- भवताल रिसर्च टीम

...

भवताल

उत्तम, दर्जेदार वाचनासाठी सर्वोत्तम पर्याय

0 Comments

Your Comment

Required fields are marked *

You may also like