Articles 
आगळी वेगळी ‘भवताल इकोटूर’

आगळी वेगळी ‘भवताल इकोटूर’

मेघालय-काझीरंगा

‘भवताल इकोटूर्स’ तर्फे फेब्रुवारी - मार्च २०२४ मध्ये मेघालय-काझीरंगा ही अतिशय आगळी टूर आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक, अंमळनेर (जळगाव), कराड (सातार) अशा वेगवेगळ्या भागातून विविध वयोगटातील सहभागी होते. डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, बँकर्स, व्यावसायिक, अभियंते, आर्किटेक्ट, सरकारी सेवेत असलेले, निवृत्त, विद्यार्थी... असे सर्व क्षेत्रातले. या गटाने एकत्र घेतलेले ज्ञान, केलेली धमाल, निसर्गाच्या आविष्कारांची अनुभूती आणि जणू एक कुटुंब असल्यासारखे एकमेकांशी निर्माण केलेले बंध... याबाबत टूरमधील एक सहभागी आणि ज्येष्ठ लेखिका प्रा. इंदुमती जोंधळे यांनी लिहिलेला वृत्तांत.

 

 

आमची मेघालय-काझीरंगा इकोटूर २४ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२४ दरम्यान होती. ती अतिशय सुरेख व अवर्णनीय अशी झाली. ‘भवताल इकोटूर्स’ या उपक्रमाचे संचालक अभिजित घोरपडे मार्गदर्शक म्हणून होते. पुण्यावरून दहा जण व मुंबईवरून आठ जण असा एकूण १८ जणांचा आमचा गट. जाताना वेगवेगळे किंवा एकेकटे म्हणून सहभागी झालेलो, येताना मात्र आम्ही एक परिवार म्हणून माघारी परतलो, यातच सारे आले. अर्थातच, आलो ते भरपूर माहिती, ज्ञान, अनुभव आणि आठवणी घेऊन!

पुणे आणि मुंबई अशा दोन्ही ठिकाणांहून सर्वच जण गुवाहाटी विमानतळावर पोहोचलो. तेथून दोन वाहनांमधून पुढचा प्रवास. पहिला थांबा होता नाश्त्याचा. ते ठिकाण छोट्या टेकडीवर, विलक्षण निसर्गरम्य होते. वेगवेगळ्या झाडांचे छत, चहुबाजूंनी सुपारी, पामची उंचच उंच झाडं. त्याच्यामध्ये बेंच व खुर्च्या टाकलेल्या अशा ठिकाणी आमचा नाश्ता झाला. त्या वातावरणामुळे पदार्थांची चव वाढली नाही तरच नवल. तिथे एकमेकांचा परिचय करून घेतला. इथूनच आमच्या परिवाराची पायाभरणी झाली. तिथे नैसर्गिक पेन सापडले. म्हणजे बांबूच्या दोन पेरांमध्ये वाढणारी ती टरफले. त्यांचा आकार अगदी शाईपेनसारखा होता. अशा छोट्या गोष्टींमुळे हा नैसर्गिक रिसॉर्ट आमच्या कायम लक्षात राहिला.

ऑर्किड… त्याच्या कितीतरी तऱ्हा!
पुढचा टप्पा होता, एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध असलेले काझीरंगा. काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर केले असले तरी येथील स्थानिक लोकांच्या स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारची गदा आलेली नाही. हे उद्यान नैसर्गिक व जैवविविधतेने नटलेले आहे. एकशिंगी गेंडा आणि वन्य जीवांच्या पलीकडे तिथे आणखीही बरेच काही आहे. प्रत्यक्ष जंगल पाहण्याचे नियोजन दुसऱ्या दिवसाचे होते. पहिल्या दिवशी तेथील आर्किड उद्यान पाहिले. विस्मयचकित करणारा हा अनुभव. कारण तिथे ७०० ते ८०० जातींच्या विविध रंगाची, आकाराची ऑर्किड, त्यांची फुले. किती वेळ तरी पहातच राहावं अशी. तिथून पायच हालत नव्हता, इतकी विविधता त्या फुलांमध्ये, त्यांच्या टेक्सचरमध्ये, आकारामध्ये, रंगांमध्ये बघत होतो. इथली फुले म्हणजे जणू कुणी नृत्य करणाऱ्या युवती, कुणी परी सारखे फ्रॉक घातलेल्या, तर कुठे शंख शिंपल्यासारखी, तर कुठे कुत्र्या-मांजराच्या कानासारखी उभी फुले. काही फुले तर इतकी वेगळी की कोणी तबला, डग्गा वाजवतायत असे, तुतारीसारखी  पोकळ, बाटलीसारखी त्यावर काही झाकणं असलेली. यापैकी काहींचे वैशिष्ट्य  म्हणजे त्याचा आकर्षक रंग, वास यामुळे कीटक या फुलाकडे आकर्षिले जातात आणि त्याच्या पोकळीत प्रवेश करतात. एकदा का आत गेले की खेळ खल्लास. पुढं जे काही करायचे ते फूल करते. कीटकामधला रस शोषून घेते, त्याचे आवरण तेवढे शिल्लक राहते. कारण या कीटकभक्षी वनस्पती आहेत. आपल्याला शाळेच्या विज्ञानाच्या पुस्तकात दिसलेल्या या वनस्पती इथे प्रत्यक्षात पाहताना खूपच वेगळ्या भावना होत्या.

 

हा फुलांचा बगीचा पाहून, त्यांची नेटकी निगा राखलेली पाहून असं वाटलं की आमच्या महाराष्ट्रामध्ये अशी विविधता, इतकी काळजी घेतलेल्या फुलबागा आम्हाला कधी आणि कुठे दिसतील बरे? तिथला फुलांचा रंगोत्सव पाहून नुकत्याच येणाऱ्या रंगपंचमी-धुळवळीची आठवण झाली. त्यानंतर बांबू बनात गेलो. ७० ते ८० प्रकारचे बांबू पाहून आश्चर्यचकित झालो. एक बांबू वाढण्यासाठी चार महिने लागतात व ते जवळजवळ ७० फुटांपर्यंत वाढत राहते. त्याचा किती विविध प्रकारे उपयोग केला जातो ते वस्तूच्या स्वरूपात आम्ही तिथे पाहिले. बांबूपासून केलेल्या विविध प्रकारच्या बासऱ्या, अनेक प्रकारची वाद्यं आणि तिथे बासरी वाजवणारा- इतर अनेक वाद्य वाजवणारा एक तरुण, त्या बासरीमधून सुंदर सूर काढत होता. निरनिराळ्या प्रकारची खेळणी, आभूषणे, स्त्रियांच्या पर्सेस आणि अनेक वस्तू तिथे पाहिल्या. तिथेच आदिवासी स्त्री-पुरुषांचे नृत्य पाहिले. त्या दिवशी आमचा काझीरंगामध्येच सुंदरशा हॉटेलमध्ये मुक्काम होता

.

हत्तीवरून जंगलाची सैर
आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता हत्तीवरून जंगलाची सैर करण्यासाठी अर्थात ‘एलिफंट सफारी’साठी बाहेर पडलो. हवेत गारठा, पूर्वेला अतिशय सुरेख असे सूर्योदयाचे दृश्य दिसत होते. प्रत्येक हत्तीवर चार जण असे आम्ही सर्वांनी जंगल फिरायला सुरुवात केली. तो एक नवा अनुभव होता. संपूर्ण जंगलभर आम्हाला गेंडे (ऱ्हायनासोर), हरणे, जंगली हत्ती आणि इतर अनेक प्राणी पाहायला मिळाले. गजगतीने डुलत डुलत पुढे पुढे काय दिसते ते पाहात जात होतो. धुक्यामध्ये दिसणारे प्राणी आणि एकूणच सगळं वातावरण मनाला भुरळ पाडणारं होतं. ही हत्तीची सैर म्हणजे सर्वांसाठीच एक नवा आल्हाददायक अनुभव देऊन गेली.

हत्तीची सैर झाल्यानंतर मग जीप सफारी. ती जवळजवळ दोनेक तासांची. कितीतरी वेळ जंगलात फिरताना, तिथले गवताळ प्रदेश, जंगल, दलदलीचा प्रदेश पाहताना, तिथून वाहणारे नद्यांचे प्रवाह ओलांडताना कितीतरी प्रकारच्या वनस्पती, उंचावर घरटी करून असलेली गिधाडे, प्राणी-पक्षी, जलचर यांचे दर्शन होत होते. पक्ष्यांचे तर कितीतरी प्रकार... जंगलातील आवाजाने, जीवांच्या हालचालींनी वेगळी अनुभूती मिळत होती. जंगल तेच, पण उघड्या जीपगाडीतून पाहताना वेगळे भासत होते.

शिलाँग –डॉन बॉस्को-मॉफलाँग
काझीरंगा मनसोक्त अनुभवल्यावर तिथून शिलाँगकडे निघालो. ही एकेकाळी आसामची राजधानी. आसामचे विभाजन झाल्यानंतर आता मेघालयाची राजधानी. शहराचे जुनेपण उठून दिसते. त्या दिवसाचा मुक्काम शिलाँगजवळ असलेल्या उमियम नावाच्या ठिकाणी होता. निसर्गसुंदर असा परिसर आणि तिथे छानसं टुमदार हॉटेल. तिथे मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी उमियम तलावात स्पीड बोटची सैर केली. हाही एक नवा अनुभव होता.

 

शिलाँगमधले ‘डॉन बॉस्को’ म्युझियम पाहिले. तिथे ईशान्य भारतातील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले. त्यांचे एकूणच जीवन, पूर्व-इतिहास, त्यांनी वापरलेली आयुधे, हत्यारे, साधने, त्यांचे पेहराव, जीवन पद्धती, घरांची रचना, दैनंदिन वापरातील असंख्य गोष्टींचा संग्रह आणि त्यांनी केलेली प्रगती, नवे शोध व आधुनिकता, मूळ पिंड न सोडता केलेली प्रगती हे सर्व या म्युझियममध्ये पाहायला मिळाले. ते भव्य प्रदर्शन किती तरी वेळ पहातच रहावे, तिथून हलूच नये असे वाटत होते. पण शेवटी तिथून बाहेर पडावे लागले.

मॉफलाँग सॅक्रेड फॉरेस्ट

पुढचे ठिकाण होते, ‘मॉफलाँग सॅक्रेड फॉरेस्ट’. मेघालयातील घनदाट जंगल. सॅक्रेड फॉरेस्ट म्हणजे पवित्र स्थान. म्हणजे आपल्याकडील देवराई. या लोकांनी त्याचे अतिशय उत्तमरित्या जतन आणि संवर्धनही केलेले आहे. त्याविषयी त्यांच्या काही धारणा आहेत, परंपरा-श्रद्धा आहेत आणि अंधश्रद्धा सुद्धा आहेत. त्या घनदाट जंगलाविषयी एका १८ ते २० वर्षांच्या तरूण गाईडने अतिशय रंजक पद्धतीने माहिती करून दिली. सायंकाळी पाच वाजताच अंधाराचे जाळे दाटून आल्याने आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी तिथून निघालो.

छोटीशी बॉर्डर

पुढचा दिवस मेघालयातील प्रसिद्ध ‘डावकी’ या ठिकाणाला भेट होती. तिथली उम्नगॉट ही अतिशय नितळ, स्वच्छ पाण्याची पारदर्शक नदी. या नदीत बोटिंग केले. तिथल्या गोलाकार आणि विविध रंगछटांच्या गोट्यांनी भरलेले वाळवंट पाहिले. याच नदीपात्रात वैशिष्ट्यपूर्ण अशी भारत-बांगलादेश सीमा आहे. एरवी दोन देशांची सीमा म्हणजे तारेचे कुंपण, वीजेचा प्रवाह असे बरेच काही असते. इथली सीमा म्हणजे दगड-गोट्यांचा एक छोटासा बांध, अगदी शेताच्या बांधापेक्षाही लहान. त्याच्या अलीकडे भारत आणि पलीकडे सखल बांग्लादेश. पलीकडे बांगलादेशी लोक, तर अलीकडे आम्ही. नदीच्या दोन्ही काठावर उंचच उंच पर्वतावर घनदाट झाडी असलेली अतिशय सुंदर अशी ही नदी. या नदीतील सीमा रेषा, नदीला पूर आला की  एक होऊन जाते. या गावी रात्रीच्या वेळेला ‘लिव्हिंग रूट ब्रिज’ म्हणजे झाडांच्या पारंब्यांपासून तयार केलेला पूल. तो आम्ही गर्द अंधारात पार केला. त्या अंधारात  एकमेकांचे हात धरून हळूहळू पुढे जात होतो, खालून मोठा ओढा वाहत होता. पाण्याचा खळखळ आवाज, रात किड्यांचा आवाज, जंगलाचा एक विशिष्ट गंध आणि मधूनच चमचमणारे, क्षणासाठी प्रकाश देणारे काजवे आम्हाला जणू मार्ग दाखवत होते. डोळे क्षणभर दीपत होते. असा सर्व सुंदर माहोलच तयार झाला होता. हा अनुभव मात्र सर्वार्थाने वेगळा आणि रोमांचकारी होता. तिथे काही वेळ शांत बसून हा अनुभव मनात साठवून घेतला. 

आशिया खंडातील स्वच्छ, सुंदर गाव मॉलिनाँग

पुढे मॉलिनाँग या गावात मुक्कामाला पोहोचलो. आशिया खंडातील सर्वात स्वच्छ सुंदर गाव म्हणून याचा नावलौकिक आहे. ना प्लास्टिक, ना पालापाचोळा रात्रीचे जेवण झाल्यावर अभिजीतने गाव बदलणाऱ्या पुढाऱ्याला बोलवले. गावाची माहिती, इतिहास आणि गावात झालेले बदल यासंबंधी त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यातून गावाचे पालटलेले रूप नेमकेपणाने लक्षात आले. दुसऱ्या दिवशी पहाटेच आम्ही हे गाव पाहायला निघालो, खरोखर चित्रातल्या सारखे सुरेख गाव. स्वच्छ रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा  फुलांच्या बागा, जागोजागी बांबूपासून बनवलेल्या शंकूच्या आकाराच्या कचराकुंड्या आणि गावाभोवती, घराभोवती घनदाट झाडी. मुद्दाम राखलेली-वाढवलेली. मालिनाँग गावात रस्त्यात कुठेही प्लास्टिक नाही. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या नाहीत, किंवा झाडांचा पालापाचोळासुद्धा नाही.

सगळा कचरा त्या कचराकुंडीत. पुढे एके ठिकाणी झाडांच्या आधाराने आणि बांबूच्या साहाय्याने उंच आणि रुंद शिडी तयार केलेली. त्या शिडीवरून ४०-४२ फूट वर एक मचान तयार केलेले. त्याच्यावर उभे राहून संपूर्ण मॉलिनाँग गाव पाहायला मिळतं. घनदाट झाडीमध्ये लपलेलं, चारी बाजूने डोंगर, घनगर्द झाडीने व्यापलेले जणू काही गोष्टीतल्यासारखे असं सुंदर देखणं गाव. शिवाय लांबवर बांगलादेशचा मैदानी प्रदेश दिसतो. तिथून मान्सूनचा प्रवास, भूरचना, त्याच्यामुळे या प्रदेशात पडणारा सर्वाधिक पाऊस या सर्व गोष्टी समजून घेता आल्या.

या गावातील लोक कष्टाळू आणि कमीत कमी गरजेत राहणारे, काटकसरी. छोटीशीच घरे पण देखणी. येथील स्त्रिया तशाच सुंदर, देखण्या टापटीप राहणाऱ्या आणि सदैव हसमुख. निसर्गाला सांभाळणारे हे आदिवासी, फार शिकलेले नसतील पण त्यांच्या पुढील पिढ्या शिक्षणासाठी शिलाँगला गेलेल्या. अलोट निसर्ग सौंदर्याने सदाहरित असा हा प्रदेश. आकाशाला भिडणारी उंचच उंच झाडे, तेवढेच डोंगर, उभे खडे पहाड, तर दुसऱ्या बाजूला खोल खोल दऱ्याही दिसल्या. हा मेघालय म्हणजे आमच्या देशातील एक अलौकिक असे रम्य, सौंदर्यस्थळ आहे. मॉलिनाँग मध्ये ‘बॅलेंसिंग रॉक’ अर्थात एका छोट्याशा आधारावर उभी असलेली महाकाय शिळा पाहिली. हेही एक आश्चर्यच. पुढे आम्ही व्हॉरो नदीच्या पात्रात उतरलो आणि जीवाष्म असलेले खडक पाहिले. ही सुद्धा नितळ पाण्याने भरलेली अतिशय स्वच्छ-सुंदर अशी नदी. इथेही आम्ही बोटिंग केले. तिथे वर जणू आकाशाला भिडणारा आकर्षक लोखंडी कमानी कृती ब्रिज होता. तो इतक्या उंचावर होता की, पाहताना मानेला कळ लागत होती. कीटकभक्षी वनस्पती ही याच प्रदेशात पाहिली. इतका विविध रंगी, विविध प्रकारच्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा भूभाग आमच्याच देशाचा आहे का? या पूर्वी तो का नाही पाहिला, याची खंत पुनःपुन्हा होत होती. तरूण वयात पाहणे आणि आताच्या साठीनंतरच्या वयात पाहणे यात फरकच पडतो ना? 

डबल डेकर ब्रीज आणि मनसोक्त डुंबणे

जगात सर्वात जास्त पाऊस पडणारा प्रदेश म्हणजे चेरापुंजी. त्या परिसरात अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मॉसमाई ही नैसर्गिक गुहा येथेच पाहिली. गुहा म्हणून वेरुळ-अजिंठ्याची आठवण झाली, पण ही गुहा नैसर्गिक. इथे निर्माण झालेली शिल्प म्हणजे निसर्गाचा आविष्कारच. त्या पाहणे आणि त्यांची निर्मिती समजून घेणे हा आगळा अनुभव होता. चेरापुंजी हे उंचावरचे ठिकाण. थंडीही तशीच. मात्र, दुपारी पायी चालत असाल तर ऊनही तसेच. हा आमचा प्रवासातला सहावा दिवस होता. डबल डेकर पूल. झाडांच्या मुळ्यांनी/पारंब्यांनी तयार केलेला. शेकडो वर्षांपासून लोक तो वापरत आहेत. आता पर्यटक त्याचा आनंद घेतात. पण तिथवर पोहोचणे म्हणजे सुमारे साडेतीन हजार पायऱ्या उतरणे आणि मग चढून वर येणे. त्यासाठी तुमच्या पायात ताकद व मनात हिम्मत पाहिजे. तरच हे आव्हान पेलता येते. मार्ग मात्र दाट झाडीतून, कधी अरुंद हालत्या पुलावरून जाणारा, तर कधी उभी चढत असलेला. पण हे आव्हान स्वीकारलंत की, खाली जे अनुभवायला मिळतं ते अवर्णनीय. 

 

एकावर एक असे दोन नैसर्गिक पूल. त्याच्या वरही आणखी तिसरा तयार केला जात आहे. त्याच्या खालच्या प्रवाहात स्वच्छ्, नितळ पाणी, त्यात विहरणारे मासे, त्यात पाय सोडून बसणे आणि परिसर न्याहाळणे... व्वा, क्या बात! तिथून उठूच वाटू नये, असं हे सुख. शिवाय तिथून माघारी परतताना वाटेत वागतो- वर्षभर अखंड वाहणारा धबधबा. त्याचे स्वच्छ पाणी आणि त्याच्यामुळे तयार झालेला गोलाकार तलाव- लगून लेक! त्यात डुंबायला तुम्ही तय्यार असता. लाईफ जाकीट घालूनच त्यात प्रवेश करावा लागतो. पाण्यात शिरलं की भर दुपारीसुद्धा थंड पाण्याने अंगावर शिरशिरी येते. पण एकदा आत शिरले की त्या स्पर्शाने सारा शीण, थकवा गायब. तुम्ही त्या क्षणी सर्वोच्च आनंदाचे  धनी असता! विशेष म्हणजे या तलावात पोहण्याचा आनंद शेकडो पर्यटक वर्षानुवर्षे घेत आहेत, पण पाणी जराही गढूळ किंवा घाण होत नाही, हे विशेष. ‘भवताल इकोटूर’ च्या गटामधील अर्ध्याहून अधिक लोकांनी हा आनंद मनसोक्त्त अनुभवला.

पुढचा दिवस होता- चेरापुंजीमधील अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी पाहण्याचा. सुरुवात झाली ती ‘डेव्हिड स्कॉट’ या ऐतिहासिक ट्रेलपासून. ब्रिटिशांच्या २०० वर्षापूर्वी तयार केलेला हा घोडागाडीचा
रस्ता. दगडांनी बांधून तयार केलेला हा रस्ता. तो दाट जंगलातून जातो. त्याच्यावरून चालताना इतर अनेक वनस्पती, पक्षी यांचे दर्शन झाले. मध्येच त्या काळातील काही स्मारके, दगडी पूल, त्यांच्या आकर्षक कमानी हे लक्ष वेधून घेत होते. एखादा थोडासा अवघड, निसरडा टप्पा ओलांडताना सहभागी एकमेकांना आधार देत होते, आमचा स्थानिक मार्गदर्शक-मदतनीस सुमर हा तर त्यात आघाडीवर होता. त्यातून गट एकजिनसी बनत गेला. या ट्रेलवर समृद्ध अशा जैवविविधतेचे दर्शन घडले. त्याची एक छोटीशी झलक म्हणजे- साडेपाच-सहा फूट लांबीच्या सापाची रस्त्यात आडवी पसरलेली कात. बाकी झाडांवरील, जमिनीवरील कितीतरी ऑर्किड्स, वनस्पती, फुले, बिया यातूनही समृद्ध जैवविविधतेचा अंदाज येत होता. 

चेरापुंजीचा परिसर हा जगातील सर्वाधिक पावसाचा. तो तसा का? आणि सर्वाधिक पाऊस कुठे-कसा मोजला जातो? हे समजून घेण्यासाठी तिथल्या हवामान केंद्राला भेट दिली. त्या यंत्रणा पाहणे आणि पावसाचे विश्व समजून घेणे आनंददायी होते. या भेटीची पूर्वपरवानगी घेतलेली असल्याने तेथील अधिकाऱ्याने आम्हाला या सर्व गोष्टी फिरून दाखवल्या. भारताप्रमाणेच इतर देशांनाही जगातील सर्वाधिक पावसाच्या या प्रदेशामध्ये रस आहे. म्हणूनच तिथे अमेरिका, जपान, जर्मनी या राष्ट्रांनी सुद्धा पाऊस-हवामान मोजण्याची आपापली यंत्रणा उभी केली आहे... अशा वेगळ्या- ज्ञानात भर पाडणाऱ्या आणि वेगळा अनुभव देणाऱ्या बाबी ही या ‘भवताल इकोटूर’ ची खासीयत. नाहीतर चेरापुंजीचे हवामान केंद्र, डेव्हिड स्कॉट ट्रेल, फॉसिल बेड्स पाहणे-अनुभवणे-समजून घेणे यांच्या वाटेला कशाला कोण जाईल?

आता टूर शेवटाकडे आली होती. फक्त एकच दिवस, त्यानंतर टूर संपणार. त्यामुळे रुखरुख लागून राहिली होती. या टूरमधला शेवटचा मुक्काम उमियम तलावाजवळचा. नुकताच छोट्या इंद्रजीतचा वाढदिवस आणि शेणई दांपत्याचा लग्नाचा वाढदिवस झाले होते. ते या मुक्कामात साजरे केले. हास्य, विनोद, गप्पा आणि या साऱ्यासोबत जेवण... तिथल्या निसर्गरम्य, थंडगार वातावरणात हा दिवस कसा संपला हे लक्षातच आले नाही.

इकोटूरचा शेवटचा दिवस

शेवटच्या दिवशी बॅगा भरताना प्रत्येकालाच वेगळे काहीतरी जाणवत होते. कारण आता एकत्र मुक्काम नसणार होता. आजच्या दिवशी सर्व जण थेट आपापल्या घरी जाणार होते. भरभरून बोलणे, निरोप घेणे, पुन्हा भेटण्याचे बेत आखणे हे सर्व करून आम्ही गुवाहटीकडे निघालो. वाटेत 'कामाख्या' देवीच्या दर्शनाचे नियोजन होते. भारतातील चार शक्तिपीठांपैकी हे एक. आठव्या शतकात बांधलेले, अतिशय सुंदर नक्षीदार कोरीव घडणीचे नमुना असलेले देखणे मंदिर, त्यावरील शिल्प! आपल्या महाराष्ट्रातल्या जुन्या मंदिरांची आठवण करुन देणारे असे हे मंदिर. त्याला जुनेपणा असला तरी व्यवस्थांच्या सुधारणेला भरपूर वाव आहे. अस्वस्छता, आवारात भिकारी, देवासाठी सोडलेल्या छोटे-मोठे बोकड सर्वत्र फिरत होते, काहींचे केविलवाणे बेंबें... कितीतरी बदल करता येऊ शकतात. भाविकांच्या गर्दीमध्ये जोडी जोडीने देवीच्या दर्शनाला आलेली नवदांपत्यही दिसत होती. या मंदिरातून पुढे विमानतळाकडे...

एकूणच, आम्हा सर्वांना ही इकोटूर अतिशय आनंददायी, उत्साहवर्धक ठरली. कोणीही आजारी पडले नाही, वा कोणी नाराज झाले नाही. त्याचे श्रेय आयोजकांना. कारण इकोटूरचे नियोजन आणि सर्व व्यवस्था (राहणे, जेवण, प्रवास) उत्तम होत्या, शिवाय अभिजीत घोरपडे यांचे मार्गदर्शन. या टूरमध्ये दोन लहानग्यांनी- इंद्रजीत व ऊर्वी यांनी सर्वांना सतत हसतं, बोलतं, आणि खेळतं ठेवलं. दोन यंगस्टर्स- गौरी आणि सुष्मिता यांनी सर्व मोठ्यांना सांभाळून घेतले. हवे नको ते सांभाळले. बाकी सर्व तर अतिशय समजून उमजून एकोप्याने वागल्याने सुखावह झाले सारे. गुवाहटी विमानतळावरूनच कोणी मुंबईला, तर कोणी पुण्याकडे जाणार होते. तिथून आमच्या फाटाफुटीला सुरवात होताना वाईट वाटले. अर्थातच, घरचीसुद्धा ओढ होतीच. ५ मार्चच्या पहाटे सर्व जण आनंदाने आपापल्या घरी सुखासमाधानात पोहचले, त्या आठ-नऊ दिवसांचा सुखद सहवास मनात ठेवूनच. धन्यवाद अभिजीत आणि इकोटूरमध्ये सहभागी झालेली संपूर्ण टीम!!

- इंदूमती जोंधळे
[email protected]

(ज्येष्ठ लेखिका व इकोटूरमधील सहभागी)


‘भवताल इकोटूर्स’ व इतर उपक्रमांचे अपडेट्स हवे असल्यास पुढील क्रमांकावर, ई-मेलवर आपले नाव मेसेज करा आणि ‘भवताल अपडेट्स’ असे टाईप करा. आपला व्हाट्सअप नंबर
भवताल अपडेट्सच्या ब्रॉडकास्ट ग्रुपवर सामावून घेतला जाईल. त्या ग्रुपवर नियमित अपडेट्स मिळत राहतील.

9545350862 / [email protected]

Tags:
भवताल, इकोटूर, मेघालय, काझीरंगा, चेरापुंजी, ट्रेकिंग
Bhavatal, Ecotour, Meghalaya, Kaziranga, Trekking

0 Comments

Your Comment

Required fields are marked *

You may also like