Articles 
गुपचूप रक्त शोषणाऱ्या इवल्याश्या जळूची गोष्ट!

गुपचूप रक्त शोषणाऱ्या इवल्याश्या जळूची गोष्ट!

गुपचूप रक्त शोषणाऱ्या इवल्याश्या जळूची गोष्ट!

(भवतालाच्या गोष्टी ३४)

जळू. हा शब्द ऐकल्यावर अनेकांच्या मनात काय येते? तर पावसाळ्याच्या दिवसात जंगलात फिरताना पायावर चढणारा आणि रक्त पिणारा जीव! जळूचे शास्त्रीय वर्गीकरण phylam- Annelida मध्ये केले जाते. Annelida चा अर्थ छोटी रिंग. ज्या प्राण्यांच्या शरीरात छोट्या छोट्या रिंग आहेत. त्यांचा समावेश Annelida मध्ये होतो. एकेमागे एक रिंग जोडत तयार झालेली शरीर रचना या प्राण्यांमध्ये असते. पृथ्वीवर या प्रकारच्या १७,००० प्रजाती असल्याचे मानले जाते. यातलाच सर्वांना माहीत असलेला एक प्राणी म्हणजे गांडूळ. या वर्गातलाच एक जीव जळू!

जळवांचे शरीर ३३ ते १०२ रिंगा जोडून तयार झालेले असते. तिच्या शरीराच्या दोन्ही टोकांना दोन शोषक (sucker) असतात. त्यांचा उपयोग एखाद्या ठिकाणाला पकडून राहण्यासाठी किंवा चालणे, खाणे यासाठी होतो. अन्न पचवणे, श्वास घेणे, शरीरात रक्त पसरवणे, इत्यादीसाठी विविध अवयवांनी बनलेल्या संस्था कार्यरत असतात. जळूच्या शरीरात कोणतेही कडक हाड नसल्याने तिचा अपृष्ठवंशीय (invertebrate) प्राण्यांमध्ये गणल्या जातात. एक नावीन्यपूर्ण गोष्ट बऱ्याचशा अप्रगत अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये आहे. ती म्हणजे एकाच प्राण्यात नर आणि मादी यांची प्रजनन संस्था असते. त्याला Hermaphrodite म्हणतात.

फक्त १० टक्के प्रजाती रक्त पिणाऱ्या

जळवा जमिनीवर, गोड्या पाण्यात तसेच खाऱ्या पाण्यातही राहतात. पण बहुतांशी त्या गोड्या पाण्यातच आढळतात. जळवांचे ७०० प्रकार ज्ञात आहेत. त्यापैकी केवळ १० टक्के जळवा रक्तपिपासू असतात. छोटे प्राणी गिळणे, मोठ्या प्राण्यांच्या जखमांना चिकटून त्यातून अन्न घेणे, मृत मासे व इतर प्राण्यांचे मांस यावर त्यांची उपजिविका चालते. या जळवा अन्नासाठी भक्ष्याला चिकटल्या की पोट भरल्यावरच गळून पडतात.

यातील रक्तपिपासू जळवांचा उपयोग फार पूर्वीपासून रोग उपचारांसाठी केल्याच्या इतिहासात नोंदी आहेत. इसविसन पूर्व १६०० ते इसविसन पूर्व १३०० या काळातील म्हणजेच आजपासून ३६०० ते ३३०० वर्षांपूर्वीच्या काळात इजिप्तमधील चित्रात त्या दिसतात. तेथील एका थडग्यामध्ये काढलेल्या चित्रामध्ये जळवा मानवी शरीराला चिकटलेल्या दिसतात. १९ व्या शतकात यावर अनेक प्रयोग केले गेले. १८३० ते १८४० च्या दशकात उपचारासाठी ६० लाख जळवा वापरल्याच्या नोंदी आहेत. भारत, चीन, फ्रान्स, जर्मनी, इजिप्त या देशात यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. १९५० मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये जळवांचा वापर डोकेदुखी, सांधेदुखी, स्नायू लचकणे, गळू आदींच्या उपचारांसाठी केल्याचा आढळतो.

अशुद्ध रक्त आणि शुद्ध रक्त

सध्या जळवांचा उपयोग मधुमेही व्यक्तींना झालेल्या जखमा लवकर बऱ्या होण्यासाठी त्यातील दूषित रक्त पिऊन घेण्यासाठी वापरल्या जातात. आयुर्वेदामध्ये रक्तमोशनम पंचकर्म आहे. त्यामध्ये जळुकवचरणम् हा एक भाग आहे. यामध्ये खरूज, गळू, सोरायसिस इत्यादी आजारांवर उपाय म्हणून जळवा सोडल्या जातात. या दरम्यान असा अनुभव आहे की जोपर्यंत अशुद्ध रक्ताचे शोषण जळू करते, तोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या वेदना रुग्णाला होत नाहीत. वेदना होऊ लागल्या की शुद्ध रक्ताचे सेवन सुरू झाले असे समजते व ती जळू काढून टाकली जाते.

टक्कल पडलेल्या व्यक्तीला डोक्यावर परत केस येण्यासाठची त्या जागी जळवा सोडून रक्ताभिसरण वाढून काही जणांचे केस परत उगवलेले दिसून आले आहे. तारुण्यपिटिका घालविण्यासाठीही जळवांचा वापर होत असल्याचे आढळते. काही ठिकाणी तर माणसे गळाला जळवा लावून मासे पकडले जातात.

जळवांचा औषधी उपयोग कशामुळे?

जळवांचा औषधी उपयोग कशामुळे होतो? तर त्याच्या पुढच्या बाजूच्या शोषकाच्या आत तीन जबडे असतात. या जबड्यांच्या सहाय्याने भक्ष्याच्या शरीराला ती धरून ठेवते. जबड्यावरील करवतीसारख्या दातऱ्यांनी कातडं कापते व भक्ष्याला नकळत ती त्याच्या त्वचेला चिकटते. शास्त्रज्ञ असे मानतात की ती थुंकीवाटे त्या जागेला बधीर करते. पण या गोष्टीवर अजून संशोधन सुरू आहे. जळवांच्या थुंकीमध्ये १०० वेगवेगळी रसायने असतात. यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे हिरूडीन त्यावरूनच रक्तपिपासू जळवेचे नाव Hirudo असे पडले आहे. याचा महत्त्वाचा गुणधर्म असा की रक्त गोठण्याची प्रक्रिया बंद होते आणि रक्त पातळ राहून ते जखमेतून वाहत राहते.

शोषकाद्वारे हे रक्त जळू शोषून घेते आणि तिच्या पोटात असणाऱ्या १२ ते १८ कप्प्यांमध्ये भरायला सुरुवात करते. सगळे कप्पे भरल्यावर मग ती गळून पडते. हे रक्त तिला अन्न म्हणून ६ ते ८ महिने पुरू शकते. १२ ते १८ इंच लांब असणाऱ्या जळवा किती रक्त शोषत असतील याची कल्पना येऊ शकेल. गमतीची गोष्ट म्हणजे, जळू आपल्या पिलांना स्वतःच्या शरीराला चिकटवून घेऊन सगळीकडे फिरत असते.

या जळवा पाण्यात राहतात. त्या पाणी प्यायला आलेल्या प्राण्यांचे रक्त शोषतात. काही घटक असे असतात की रक्ताच्या पेशी एकमेकांना चिकटत नाहीत. रक्तवाहिन्यांचा व्यास वाढून रक्तप्रवाह सुरळीत होतो. व्हॅरिकोज व्हेन्समध्ये अशुद्ध रक्त शोषून त्या पूर्ववत केल्या जातात. कातडे बदलणे, मोठ्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर साकळलेलं रक्त काढून घेण्यासाठी उपयोग केला जातो.

पावसाशी संबंध, अन्नसाखळीतील महत्त्व

जळवांचा पावसाशी खूप जवळचा संबंध. पावसाळ्यात जंगलातील पालापाचोळ्यात उभे राहिलात तर तुमच्या पायांना जळवा नक्कीच चिकटतील. पाचगणी, महाबळेश्वरला तर डांबरी रस्त्यावरही त्या उलट्या खिळ्यासारखा उभ्या असलेल्या आढळतात. अनवाणी पाय पडला तर त्या लगेच पायाला चिकटतात.

जळवांचे अन्नसाखळीतले स्थान फारसे लक्षात येत नसले तरी खूपच महत्त्वाचे आहे. ज्या प्रमाणे सगळ्या सापांना विषारी समजून त्यांच्याबाबत भीती बाळगली जाते, त्याप्रमाणे सर्व जळवा रक्तपिपासू असा एक समज झाला आहे. बहुतांश जळवा या प्राणी व वनस्पतींच्या कुजलेल्या अवशेषांवर जगतात. त्यामुळे त्या निसर्ग स्वच्छ राखण्याचे काम करत असतात. त्या स्वतः पक्षांचे खाद्य असल्यामुळे त्या एक अन्नसाखळीतील महत्त्वाचा एक घटक आहे. त्यांच्या संख्येत घट झाल्यास साहजिकच अन्नसाखळी बिघडल्याने दुष्परिणाम जाणविण्याची शक्यता आहे. सतराव्या, आठराव्या शतकात असाच परिणाम जळवांची सर्वांत मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने पाश्चिमात्य देशात झाला होता. यावरचा उपाय म्हणून त्यांनी जळवांच्या निर्यातीवर बंदी घातली होती.

जळवांना धोका

संपूर्ण देशात सध्या वेगळीच समस्या भेडसावत आहे. जागतिक तापमान वाढ, अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्ती जळवांसाठी घातक ठरल्या आहेत. या आपत्तींचा सामना करण्याची ताकद येत नसल्याने त्यांच्या संख्येत मोठी घट होण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या देशात फार वेगळे चित्र नाही. औद्योगिकरण व शहरीकरण झपाट्याने वाढत असल्याने जळवांचा अधिवासच नष्ट व्हायला सुरुवात झाली आहे. हे बदल जाणूनबुजून केले असतील, असे नाही.

याचे उदाहरण म्हणजे साताऱ्यातील कास पठारावरील पाण्याची बंदिस्त पाईपलाईन. ब्रिटिशकालीन उघड्या वाहणाऱ्या पाटामध्ये एपस, जळवा, चकुर किड्याच्या प्रथम अवस्था, पाणनिवळ्या व पाण्यात राहणारे जीव मुबलक प्रमाणात आढळत असे. बंदिस्त नळ योजनेमुळे हे नाले मातीने भरल्यामुळे तो एक आधिवास नष्ट झाला व प्राण्यांची संख्या कमी झाली. म्हणजे आपण जाणीवपूर्वक त्यांना नष्ट करत नसलो, तरी आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे त्यांच्यावर आघात होतच आहे.

या उपयोगी जीवांची संख्या राखण्यासाठी त्यांचा आधिवास जपणे व त्यांच्या बद्दलचे गैरसमज कमी करणे यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, आत्ताच उपाय करणे गरजेचे आहे.

(भवताल वेबसाईट वाचकांसाठीच्या भवतालाच्या गोष्टी या खास मालिकेतील ही ३४ वी गोष्ट.)

 

- डॉ. विश्वास देशपांडे

[email protected]

(भवतालच्या जुलै-ऑगस्ट २०१६ अंकातून...)

भवतालाविषयी दर्जेदार मजकुरासाठी - bhavatal.com

इतरांसोबत शेअरही करा.

4 Comments

Dhanashri

खूप छान माहिती

Bhavatal Reply

धन्यवाद.

RAVINDRA WAGH

very intresting information about Annelida

Bhavatal Reply

Thank you so much.

हेमंत त्र्यंबके

छान माहिती दिली आहे. अशुद्ध रक्त पीत असताना वेदना होत नाही आणि शुद्ध रक्त प्यायला सुरुवात केल्यावर वेदना सुरू होतात यात तथ्य नाही. जळू त्वचेला कुठेही चिकटते. रक्त पिऊन झाल्यावर गळून पडते. या पुर्ण क्रियेत कोणतीही संवेदना जाणवत नाही.

Bhavatal Reply

ओके सर. धन्यवाद.

Rajiv Sunnap

खूप छान माहिती....

Your Comment

Required fields are marked *

You may also like