Articles 
एका शिंपल्याच्या रहस्यमय प्रवासाची गोष्ट!

एका शिंपल्याच्या रहस्यमय प्रवासाची गोष्ट!

 

एका शिंपल्याच्या रहस्यमय प्रवासाची गोष्ट!
- दोन कोटी वर्षांच्या काळातली

(भवतालाच्या गोष्टी २३)
ही गोष्ट उत्कंठा वाढवणारी आहे. त्यातील पात्र आहे शिंपल्यात राहणारा एक समुद्र जीव. त्याचे नाव डोसिनिस्का. या जीवाने स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी हजारो किलोमीटर अंतर कसे पार केले, त्याची ही कहाणी! पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेतल्या आमच्या गटाने २००१ सालापासून एक अभ्यास करण्याचे ठरवले. कच्छमधल्या सुमारे दोन कोटी वर्षांपूर्वीच्या जीवाश्मांचा अभ्यास. त्यातही विशेषत: शिंपल्यांमध्ये राहणाऱ्या मृदुकाय वर्गातल्या जीवांच्या जीवाश्मांचा अभ्यास. त्या काळाचे नाव मायोसीन कालखंड. हा अभ्यास करताना डोसिनिस्काची ही भन्नाट भ्रमणगाथा आम्हाला उलगडली.

मायोसीन कालखंडाबद्दल
आधी मायोसीन कालखंडाबद्दल समजून घेतले पाहिजे. हा कालखंड दोन कोटी तीन लाख वर्षांपूर्वी सुरू झाला आणि ५३ लाख वर्षांपूर्वी संपला. म्हणजे तब्बल दीड कोटी वर्षांचा हा कालखंड. या कालखंडाच्या सुरुवातीला काही काळ गुजरातजवळील काठेवाड, कच्छ, पाकिस्तानातील सिंध आणि बलुचिस्तान या भूभागात समुद्राच्या पाण्याचे आक्रमण झाले होते. त्या काळात जगाचा नकाशा काहीसा वेगळा होता, आणि तो अतिशय मंदगतीने पण सातत्याने बदलत होता. भारतीय द्वीपकल्प हळूहळू उत्तरेकडे सरकत होता. मायोसीन कालखंडाच्या सुरुवातीला नुकतीच हिमालयाची निर्मिती सुरू झाली होती. हिमालयाची निर्मिती होण्यापूर्वी या पर्वताच्या जागी टेथिस नावाचा महासागर अस्तित्वात होता. या महासागरात कोट्यवधी वर्षांपासून गाळ साचत आला होता. हा साठलेला गाळ व त्यामुळे बनलेले खडक उचलले गेल्यामुळे हिमालय पर्वत निर्माण झाला होता.
टेथिस समुद्र आक्रसला जाताना
त्या आधीसुद्धा टेथिस महासागर हळूहळू आक्रसला जात होता. तो आक्रसला जात असतानाच त्यातले पाणी किनाऱ्यावरच्या भागात जात होते. हा भाग म्हणजे सिंधू नदीच्या त्रिभुज प्रदेशाच्या आसपासचा सखल भाग, कच्छची भूमी आणि गुजरातचा पश्चिम किनारा. तिथे या पाण्याचे अधूनमधून अतिक्रमण होतच होते; आणि समुद्राकाठच्या जमिनीवर तात्पुरते उथळ समुद्रही निर्माण होत होते. ही क्रिया मायोसीन काळाच्या आधी सुरू होती. त्या काळी जमिनीची आणि समुद्राची स्थिती पूर्णपणे वेगळी होती. कारण हिमालयाची (आणि आल्प्सचीसुद्धा!) निर्मिती पूर्ण झाली नव्हती. त्या जागी टेथिस हा महासागर अस्तित्वात होता. त्यामुळे सिंधू नदीचा त्रिभुज प्रदेश, कच्छ, गुजरातचा पश्चिम किनारा या भागातल्या अतिक्रमणांनी निर्माण झालेले समुद्र हे टेथिस महासागराद्वारे युरोपातल्या समुद्रांशी जोडले गेले होते. त्यामुळे इकडच्या समुद्रांमधल्या प्राणीसमूहांमधल्या काही प्रजाती आणि काही जाती युरोपातल्या समुद्रांमधे आढळत असत. या समुद्राचे अतिक्रमण झालेल्या आपल्याकडील प्रदेशातील जीव आणि तत्कालीन युरोपियन सागरी जीव यांच्यात साधर्म्य पाहायला मिळत होते.
पण मायोसीन कालखंड सुरू झाला, तेव्हा परिस्थिती बदलत गेली. हिमालयाची निर्मिती पूर्ण होऊन टेथिस महासागराचे अस्तित्व संपले होते. त्यामुळे सिंधू नदीचा त्रिभुज प्रदेश, कच्छ, गुजरातचा पश्चिम किनारा या भागातले समुद्र युरोपातल्या समुद्रांपासून विभक्त झाले होते. इकडच्या समुद्रातल्या प्राण्यांना युरोपातल्या समुद्रांमधे शिरकाव करण्यासाठी मार्गच उरला नाही.
संशोधनाला नव्याने सुरूवात
कच्छमधल्या मायोसीनकालीन खडकांतल्या जीवाश्मांचा अभ्यास २००१ सालापर्यंत व्हावा तितका झाला नव्हता. १८८५ मधे दोन ब्रिटिश संशोधकांनी, मार्टिन आणि स्लॅडेन यांनी या खडकातल्या एकिनॉइडवर्गीय जीवाश्मांचा, तर १९२५ आणि १९२८ मधे फ्रेडेनबुर्ग यांनी या खडकातल्या मृदुकायवर्गीय जीवाश्मांचा अभ्यास केला होता. त्यावरून फ्रेडेनबुर्ग यांनी, कच्छमधल्या मायोसीनकालीन जीवाश्मांचे साधर्म्य नेमके कोणाशी आहे हे दाखवून दिले होते. हे साधर्म्य युरोपातल्या समकालीन जीवाश्मांशी नसून, ईस्ट इंडीज् बेटातील जीवाश्मांशी आहे, तसेच ईस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे टिमोर नावाचे बेट आहे. त्या टिमोर बेटावरील मायोसीनकालीन जीवाश्मांचेही साधर्म्य कच्छमधल्या जीवाश्मांशी आहे, असे फ्रेडेनबुर्ग यांनी दाखवून दिले.
१९२८ नंतर कच्छमधल्या त्या खडकांमधून नव्याने जीवाश्म गोळा करून त्यांचा अभ्यास करण्याचे, किंवा किमान मार्टिन आणि स्लॅडेन, अथवा फ्रेडेनबुर्ग यांनी वर्णन केलेल्या जीवाश्मांचे पुन्हा परीक्षण करण्याचे कुणाच्या मनातही आले नाही. हे काम करण्याचे, पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेतल्या आमच्या गटाने ठरवले. आम्ही २००१ पासून इथल्या जीवाश्मांचा नव्याने अभ्यास करायला सुरूवात केली. या कच्छमधील मायोसीनकालीन जीवाश्मसमूहाच्या संशोधनातून एक अत्यंत महत्त्वाची माहिती निदर्शनास आली.

कच्छ आणि ऑस्ट्रेलियाचा संबंध
ऑस्ट्रेलिया खंडाच्या वायव्य किनाऱ्याजवळ बॅरो नावाचे एक बेट आहे. त्या बेटावरही मायोसीन काळातील खडक आहेत, असा शोध दोघा ऑस्ट्रेलियन संशोधकांना १९९४ मधे लागला होता. कच्छमधे आढळणारे दोन एकिनॉइडवर्गीय जीवाश्मही त्यांना त्या खडकात सापडले. शिवाय ईस्ट इंडीज् बेटांवरील मायोसीनकालीन खडकातले काही जीवाश्मही त्यांना बॅरो बेटावरील खडकात सापडले होते. या पार्श्वभूमीवर आम्हाला आणखी एक स्वारस्य वाढवणारी बाब आढळली. ती म्हणजे ऑस्ट्रेलिया खंडाजवळच्या बॅरो बेटावरील खडकात सापडलेल्या जीवाश्मांशी लागेबांधे सांगणारे काही जीवाश्म आम्हाला कच्छमधे नव्याने सापडले. या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून आमच्या गटाने असा निष्कर्ष काढला की मायोसीन कालखंडाच्या सुरुवातीच्या काळात कच्छ ते बॅरो बेट यादरम्यान काही सागरी प्राण्यांचे स्थलांतर होत होते. हे स्थलांतर श्रीलंका, ईस्ट इंडीज्, टिमोर बेट या मार्गाने इकडून तिकडे आणि तिकडून इकडे असे होत होते. याच्याही पुढे आणखी एक बाब प्रकाशात येणार होती.
एकीकडे ओळखायला अवघड असणाऱ्या शिंपल्यांच्या जीवाश्मांवर आमचे काम सुरूच होते. एके दिवशी आमचा तो शोध पूर्ण झाला. ते शिंपले डोसिनिस्का प्रजातीचे असल्याचे समजले. मग डोसिनिस्का प्रजातीचे शिंपले कुठे कुठे मिळतात, त्याची शोधाशोध सुरू झाली. त्यांचे जीवाश्म कुठे मिळतात का? आणि मिळत असतील तर ते किती पुरातन खडकात मिळतात? याचाही शोध घेतला. तेव्हा न्यूझिलँड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या भोवतीच्या समुद्रात या प्रजातीचे शिंपले आजमितीस सुखेनैव नांदत आहेत, असे निदर्शनास आले. शिवाय या प्रजातीचे जीवाश्म जपानच्या केवळ अडीच लाख वर्षांपूर्वीच्या खडकात आढळतात, अशीही माहिती हाती आली.
यक्षप्रश्न आणि उत्तर
आमच्यासमोर यक्षप्रश्न पडला! कुठे भारतातील कच्छ, कुठे न्यूझीलँड - ऑस्ट्रेलिया आणि कुठे जपान? कुठे कच्छमधले २ कोटी ३० लाख वर्षापूर्वीचे खडक आणि कुठे जपानमधील जेमतेम अडीच लाख वर्षाचे जीवाश्म? यांचा ताळमेळ कसा बसवायचा? की आम्हाला सापडलेले जीवाश्म डोसिनिस्का प्रजातीचे नव्हतेच?... ही शंका दूर करण्यासाठी आम्ही ते जीवाश्म पुन्हा पुन्हा तपासून पाहिले. संदर्भग्रंथात लिहिलेली डोसिनिस्का प्रजातीची सर्व वैशिष्ट्ये व्यवस्थित दिसत होती. त्यापैकी एक वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक जीवाश्माच्या दोन्ही शिंपांच्या चोचीच्या दोन्ही बाजूंना कवचाच्या कडेला पडणारी मुरड. ती तर छानच दिसत होती.
यावर शांतपणे विचार, अभ्यास केला, तेव्हा या समस्येची उकल झाली. त्यातून एक भन्नाट निसर्गकहाणी पुढे आली. ती अशी= डोसिनिस्काचे सर्वात जुने जीवाश्म कच्छमधल्या २ कोटी ३० लाख वर्षांपूर्वीच्या मायोसीनकालीन खडकात आढळले. म्हणजे उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर, २ कोटी ३० लाख वर्षांपूर्वी कच्छमधे थोड्या काळासाठी निर्माण झालेल्या उथळ समुद्रात डोसिनिस्का विकसित झाला. कच्छ हे डोसिनिस्काचे उत्पत्तीस्थान ठरते.
डोसिनिस्का प्रजाती उत्क्रांत होऊन जरा स्थिरस्थावर होते ना होते, तोपर्यंत कच्छमधला समुद्रही मागे हटला, आणि टेथिस महासागराचेही अस्तित्वही शिल्लक राहिले नाही. डोसिनिस्काचा आणि त्या समुद्रातल्या इतर सर्वच सजीवांचा अधिवास संकटात सापडला. तिथले सजीव ओसरणाऱ्या पाण्याबरोबर अरबी समुद्रात येऊन पडले असावेत. त्यातल्या कितीतरी सजीवांवर नामशेष होण्याची पाळी आली असेल. अरबी समुद्रातल्या नवीन पर्यावरणाशी जमवून घेण्यासाठी काही सजीवांमधे योग्य ते जनुकीय बदल (म्युटेशन) घडून आले असावेत. डोसिनिस्का मात्र जुळवून घेता येईल अशी पर्यावरणप्रणाली कुठे आहे ते शोधत भ्रमण करू लागली. श्रीलंका, ईस्ट इंडीज्, टिमोर बेट या मार्गाने ही प्रजाती ऑस्ट्रेलिया खंडाजवळच्या बॅरो बेटाच्या दिशेने निघाली. तिचा हा प्रवास अत्यंत मंदगतीने झाला असणार, आणि तो पिढ्यानुपिढ्या चालला असणार. आता ही प्रजाती न्यूझीलँड आणि ऑस्ट्रेलिया इथे स्थिरावली आहे.
ती वाटेत कुठे कुठे विसावली होती, तिथे ती का स्थिरावू शकली नाही हे आपल्याला अद्याप कळलेले नाही. तसेच डोसिनिस्का प्रजातीच्या २ कोटी ३० लाख वर्षापूर्वी कच्छमधे ज्या जाती होत्या, त्यांच्यामधे काळाच्या ओघात कधी आणि कशी परिवर्तने होत गेली आणि सध्याच्या घडीला अस्तित्वात असणाऱ्या जाती कशा उत्क्रांत झाल्या हेही अद्याप समजलेले नाही. डोसिनिस्काच्या प्रवासाच्या वाटेवरील प्रदेशात आज ना उद्या या प्रजातीचे जीवाश्म सापडतील, तेव्हाच या कहाणीतले कच्चे दुवे सांधले जातील... त्याचा शोध कोणीतरी घ्यायला हवा!
- डॉ. विद्याधर बोरकर
[email protected]
(भवताल मासिकाच्या फेब्रुवारी २०२२ अंकातून...)
(भवताल वेबसाईटच्या वाचकांसाठी भवतालाच्या गोष्टी या खास मालिकेतील ही तेवीसावी गोष्ट)
भवतालाविषयी दर्जेदार वाचण्यासाठी -  bhavatal.com

(इतरांसोबतही शेअर करा)

2 Comments

Avinash Badadhe

छान माहिती, video रुपात माहितीपट बनवता येऊ शकेन, तर अजून Intrresting होईन...

Bhavatal Reply

आपली सूचना महत्त्वाची आहे. नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.

Sachin Patwardhan

Incredible

Bhavatal Reply

Thank you.

Your Comment

Required fields are marked *

You may also like