Articles 
कानवेल (वनस्पतींच्या नावांच्या गोष्टी)

कानवेल (वनस्पतींच्या नावांच्या गोष्टी)

कानवेल

शास्त्रीय नाव- एरिडस मॅक्युलोसम

पश्चिम घाट प्रदेशात मार्च ते जून या महिन्यांच्या दरम्यान बहुतांश वनस्पतींवर जांभळ्या-गुलाबी गुच्छ तुऱ्यांनी 'कानवेल' बहरून येते. कानाच्या अंतर्भागाशी निगडित व्याधींमध्ये 'कानवेल' वनस्पतीच्या मुळाचा रस काढून तो योग्य प्रमाणात कानामध्ये टाकला जातो. त्यामुळे कानाच्या व्याधी बऱ्या होतात. त्यामुळेच या वनस्पतीला ‘कानवेल’ हे नाव मिळाले. 

ऑर्किडीसी कुळातील बहुतांश वनस्पतींची मूळ स्थानिक नावे आणि अलीकडे काही उत्साहींनी रूढ केलेली विपर्यस्त नावे यांचा फारच मोठा घोळ दिसून येतो. सर्व ऑर्किड्सचा यामध्ये समावेश होतो. कानवेल ही वनस्पती याच ऑर्किडीसी वनस्पती समूहातील आहे. हा समूह तुलनेने उन्नत मानला जातो. सामान्यतः ‘एरिडस’ ही सर्वदूर म्हणजे अगदी डोंगराळ प्रदेश ते मैदानी प्रदेशापर्यंत दिसून येते. पवनोपजीवी असणारी ही वनस्पती मोठ्या वृक्षांच्या आधाराने वाढते. विशेष करून हिचा आढळ आंब्याच्या झाडावर दिसून येतो. आंब्याच्या झाडावर येते म्हणून हिला ‘आमरी’ असे म्हटले जाते. ती विशेषत: कोकणात या नावाने ओळखली जाते. पण हल्ली जवळपास सर्वच ऑर्किड्सना, मग ते जमिनीवर येणारे (टेरेस्ट्रियल) असोत, दगडावर येणारे (लिथोफाइट) असोत, मृतोपजीवी (सॅप्रोफाईट) असोत अथवा झाडांवर येणारी (इपीफाइट्स) असोत, या सर्वांसाठी एकसारखेच नाव वापरले जाते- ‘आमरी’, मग ती आंब्याच्या झाडावर आढळणारी नसली तरीसुद्धा! याउलट, जवळपास सर्व ऑर्किड्सना त्यांच्या वितरणानुसार वेगवेगळी, पण अतिशय समर्पक स्थानिक नावे प्रचलित आहेत. ती आता मागे पडत चालली आहेत. 

आता कानवेल या वनस्पतीबद्दल. सातारा परिसरात या विशिष्ट ऑर्किडला ‘कानवेल’ हे नाव प्रचलित आहे. ते अगदीच समर्पक आहे. मार्च ते जून या महिन्यांच्या दरम्यान पश्चिम घाट प्रदेशात बहुतांश वनस्पतींवर हे ऑर्किड जांभळ्या-गुलाबी गुच्छ तुऱ्यांनी बहरून येते. त्याच्या फुलांना मंद सुवास असतो. ही फुले अत्यंत आकर्षक दिसतात. या हंगामामध्ये या भागातील महिला ही फुले गजऱ्याप्रमाणे केसात माळतात. तर परिसरातील लोक कानाच्या अंतर्भागाशी निगडित व्याधींमध्ये या वनस्पतीच्या मुळाचा रस काढून तो योग्य प्रमाणात कानामध्ये टाकतात. त्यामुळे कानाच्या व्याधी बऱ्या होतात, असे त्यांचे मानणे आहे. त्यामुळेच मग या वनस्पतीस ‘कानवेल’ हे नाव मिळाले. स्थानिक पातळीवरील वापराशी आणि उपयोगाशी संबंधित असे हे नाव! पण अलीकडच्या काही मंडळींनी याला अगदीच भेसळ असलेले नाव दिले आहे. ते म्हणजे- टिपके इरिड आमरी. त्याच्या तीन शब्दांचा संबंध ओढून ताणून लावावा लागतो किंवा नाव दिलेच आहे, तर गोड मानून
घ्यावे लागते. म्हणूनच कितीतरी पिढ्यांपासून वापरले जाणारे ‘कानवेल’ हे नाव वापरणे योग्य!

स्थानिक नाव- कानवेल

नंतरचे नाव- टिपके इरिड आमरी

- सुनील भोईटे
9421997301 / [email protected]

(लेखक सातारा येथील निसर्ग अभ्यासक व मानद वन्यजीव रक्षक आहेत.)

वनस्पतींचे नाव किती महत्त्वाचे?
असे कोणी विचारेल, पण नावात बरेच काही आहे. नावात अस्तित्व आहे, इतिहास आहे, सांस्कृतिक वारसा आहे आणि ज्याला नाव दिले गेले त्याची संपूर्ण ओळख आहे. म्हणून नाव महत्त्वाचे. ते पुसले गेले किंवा बदलले की जणू त्या गोष्टीची, त्याच्याशी संबंधित असलेल्या भवतालाची आणि समुदायाची ओळखच पुसली जाऊ शकते. अलीकडे काही मंडळी स्थानिक संदर्भांच्या अज्ञानातून किंवा इतर कारणांमुळे या वनस्पतींना वेगळीच नावे देत आहेत. त्यामुळे मूळ नावे मागे पडू शकतात. म्हणूनच पिढ्यान पिढ्या माहीत असलेल्या वनस्पतींच्या प्रजातींची मूळ नावे व त्यांचे स्थानिक संदर्भ उलगडून दाखवणारा हा उपक्रम ‘भवताल’ मंचावर राबवत आहोत. त्यात वनस्पतिविज्ञानाचे ख्यातनाम अभ्यासक डॉ. एस. आर. यादव, डॉ. मिलिंद सरदेसाई, डॉ. अपर्णा वाटवे, या विषयाचा कितीतरी दशके धांडोळा घेणारे कृतिशील निसर्ग अभ्यासक सुनील भोईटे यांच्यासारख्या मंडळींचा समावेश आहे.

(संवाद आणि प्रतिक्रियांसाठी: [email protected])

- संपादक

(भवताल मासिक- मार्च २०२४ च्या अंकातून साभार)

0 Comments

Your Comment

Required fields are marked *

You may also like